छत्रपती संभाजीनगर 
राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने पळसगाव शिवारातील हॉटेल विवानसमोर सापळा रचून बनावट विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्या वाहनावर कारवाई केली. या कारवाईत १,४४० बाटल्या बनावट विदेशी मद्य, दोन मोबाईल व मारोती स्विफ्ट कार असा एकूण ५ लाख ८० हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांना १० ऑगस्ट रोजी गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, किरण ज्ञानेश्वर उगले आणि मंगेश घनशाम जाधव हे काळ्या रंगाच्या मारोती स्विफ्ट कारमधून (एमएच ०२ बीएम ०६४६) पानपोई-शिऊर रोडने बनावट विदेशी दारूचा साठा घेऊन जाणार आहेत. या माहितीच्या आधारे पळसगाव शिवारातील हॉटेल विवानसमोर पथकाने सापळा लावला. काही वेळाने संशयित वाहन येताच ते अडवून पंचांसमक्ष झडती घेण्यात आली. वाहनामध्ये इम्पेरिअल ब्ल्यू व्हिस्कीच्या १८० मिलीच्या ४८० बाटल्या, रॉयल स्टॅग व्हिस्कीच्या ८६४ बाटल्या आणि रॉयल चॅलेंज व्हिस्कीच्या ९६ बाटल्या आढळून आल्या. या सर्व बाटल्या विविध बॅचच्या असून एकूण १,४४० सिलबंद बाटल्या जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या मद्याची किंमत ३ लाख ४५ हजार ६०० रुपये आहे. याशिवाय दोन मोबाईल फोन व दारू वाहतूक करण्यासाठी वापरलेले वाहन असा मुद्देमालही ताब्यात घेण्यात आला. वाहनासह जप्त मुद्देमालाची एकूण किंमत ५ लाख ८० हजार ६०० रुपये असल्याचे विभागाकडून सांगण्यात आले. या प्रकरणी किरण ज्ञानेश्वर उगले व मंगेश घनशाम जाधव यांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यासह इतर कलमांन्वये गुन्ह दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई सह-आयुक्त (अं.व.द.) महाराष्ट्र राज्य (मुंबई) संगीता दरेकर, विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क छत्रपती संभाजीनगर विभाग अभिनव बालुरे, अधीक्षक  गुणाजी क्षीरसागर व उपअधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. निरीक्षक ए. एन. साळोखे, दुय्यम निरीक्षक एस. बी. माने, पी. व्ही. मुंगडे, ए. टी. निमगिरे, सहायक दुय्यम निरीक्षक ए. के. सपकाळ तसेच जवान एम. एच. बहुरे, ए. जी. शिंदे, एस. बी. महाले व एस. पी. रिंढे यांच्या पथकाने ही कारवाई केली.