वैजापूरात पोलिस प्रशासन व गणेश मंडळांची बैठक...

विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजविल्यास कठोर पावले उचलणार : उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे

वैजापूर

विसर्जन मिरवणुकीत डीजे, लेझर लाईटसह कोणत्याही इलेक्ट्राँनिक वाद्य अथवा सामुग्रीचा वापर न करता पारंपारिक वाद्यांचा वापर करावा अशी सक्त ताकीद उपविभागीय पोलिस अधिकारी भागवत फुंदे यांनी गणेश मंडळाच्या बैठकीत दिली. ३० ऑगस्ट रोजी येथील पोलिस ठाण्याच्या प्रांगणात ही बैठक पार पडली. 
 

शहरातील गणेश मंडळ पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना पोलिस प्रशासन

बैठकीला पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, सहायक पोलिस निरीक्षक विजय देशमुख यांची देखील उपस्थिती होती. यावेळी बोलताना पोनि ताईतवाले यांनी सांगितले की, डीजेच्या दणादणाटामुळे 'श्री' स्थापनेच्या दिवशी शहरातील एका सात वर्षीय मुलीचा कानाचा पडदा फाटला. याशिवाय जिल्ह्याचे पालकमंत्री व पोलिस अधीक्षक डॉ.विनयकुमार राठोड यांनी देखील डीजे मुक्त गणेश विसर्जन पार पाडावे याबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. यामुळे विसर्जन मिरवणुकीत कुणीही कायदा हातात घेऊन डीजे वाजविण्याचा अट्टाहास करू नये जो कुणी डीजे वाजवून कायदा हातात घेईल त्याच्यासह डीजेवर देखील रीतसर गुन्हा दाखल करण्यात येईल. 


यंदाच्या विसर्जन मिरवणुकीत हेच ध्वनीमापक यंत्र वापरण्यात येणार आहे.

यावर्षी आमच्याकडे ध्वनीमापक यंत्र उपलब्ध असून गरज भासल्यास या यंत्राचा देखील मिरवणूक काळात पोलिस वापर करतील. त्यामुळे ध्वनी प्रदूषण टाळून पारंपारिक वाद्यासह 'श्री' विसर्जन पार पाडा अशा सूचना या बैठकीत पोलिस निरीक्षक ताईतवाले यांनी दिल्या. याशिवाय श्री स्थापनेची परवानगी न घेतलेल्या मंडळांनी लगेचच रितसर परवानगी घ्यावी. लहान गणेश मंडळानी मोठ्या गणेश मंडळाशी संलग्न होऊन एकाच वाहनात गणेश मूर्ती विसर्जनासाठी न्यावी असे देखील आवाहन यावेळी त्यांनी केले.


बैठकीला मोठ्या संख्येने गणेश मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.


कायदा हातात घेणाऱ्यांना ३६४ दिवस नाचऊ...

या बैठकीत गणेश मंडळांना मार्गदर्शन करताना उपविभागीय पोलिस अधिकारी  भागवत फुंदे यांनी त्यांच्या रोखठोक शैलीत गणेश विसर्जन मिरवणुकीत जो कुणी कायदा हातात घेऊन पोलिसांशी अरेरावी करेल त्याला आम्ही ३६४ दिवस कायद्याच्या तालावर नाचऊ अशी तंबी देत यंदा दहा दिवसांच्या गणेशोत्सव काळात वैजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून ३०, शिऊर हद्दीतील २० तर विरगाव पोलिस ठाण्याच्या हद्दीतून २० असे तब्बल ७० जणांना हद्दपार करण्यात आले आहे. दरम्यान गणेशत्सोव काळात गणेश मंडळांनी समाज प्रबोधनपर देखावे सादर करून पारंपारिक वाद्यांसह गणेश विसर्जन मिरवणुकीत सहभागी व्हा अशा सूचना त्यांनी यावेळी केल्या.


विसर्जन मिरवणूक रात्री बारा वाजेपर्यँत..

विसर्जन मिरवणूक ही रात्री बारा वाजेपर्यंत सुरु राहणार असून जितक्या लवकर मिरवणुकीस सुरुवात होईल तितका जास्त आनंद गणेश मंडळांना घेता येईल. याशिवाय विसर्जन मिरवणुकीत 'आम्ही पुढे अन तुम्ही मागे' अशा प्रकारचा कुठलाही वाद खपवून घेतला जाणार नाही. 'जो अगोदर येईल तोच सर्वात पुढे राहील 'अशा देखील सूचना पोलिस प्रशासनाच्यावतीने या बैठकीत देण्यात आल्या.