वैजापूरातील व्यापाऱ्याला लुटणारा पोलिसांच्या जाळ्यात

छत्रपती संभाजीनगर येथील स्थागुशाच्या पथकाची कारवाई

वैजापूर
रात्रीच्या सुमारास व्यापाऱ्याला लुटणाऱ्या  एकाच्या
छत्रपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांच्या पथकाने मुसक्या आवळल्या. ३० ऑगस्ट रोजी पथकाने ही कारवाई केली. दिगंबर हरिचंद्र निकम (रा. जरुळ ता.वैजापुर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे.



याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  शुभम चंद्रभान रोठे (रा. भोलेगाव ता. येवला जि.नाशिक) यांचे वैजापूर शहरातील लाडगाव रोडलगत मेडिकल दुकान आहे. ११ नोव्हेंबर २०२३ रोजी ते रात्री साडे आठ वाजेच्या सुमारास मेडिकल बंद करून ते मोटारसायकलने गावाकडे (भोलेगाव, ता. येवला) जाण्यासाठी निघाले. दरम्यान हॉटेल राधिका समोर दोघांनी त्यांना धाक दाखवून त्यांची मोटारसायकल अडवली त्यांचे पॉकेट, मोबाईल फोन व मोटारसायकल हिसकावून आलेल्या दोघांनी तिथून पळ काढला. याप्रकरणी रोठे त्यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हाचा तपास करत असतांना स्थागुशाचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, सदरचा गन्हा हा वैजापूर तालुक्यातीलच जरुळ येथील दिगंबर निकम  याने केला आहे. त्यावरुन स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सदर आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. पोलिसांनी त्याला विश्वासात घेऊन वैजापुर येथील जबरी चोरीच्या गुन्ह्याबाबत विचारपुस केली असता त्याने गुन्हा कबुल करुन गुन्ह्यातील मुद्देमाल परत दिला. पोलिसांनी तो पंचनामा करुन जप्त केला. दरम्यान दिगंबर निकम हा अट्टल गुन्हेगारी प्रवृत्तीचा असल्याचे व त्याच्याविरुध्द राहता पोलिस ठाण्यात खुनाचा तर 
नांदगाव पोलिस ठाण्यात सोनसाखळी चोरी, शासकीय कामात अडथळा व कोपरगाव पोलिस ठाण्यातही विविध कलमान्वये गुन्हा दाखल असल्याची बाब पोलिसांना समजली. सदरची कामगिरी डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलिस अधिक्षक अत्रपुर्णा सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थागुशाचे पोलिस निरीक्षक विजयसिंग राजपुत, सपोनि पवन इंगळे, पोलीस अंमलदार वाल्मिक निकम, अशोक वाघ, शिवानंद बनगे, अनिल काळे, योगेश तरमळे, जीवन घोलप, संजय तांदळे यांच्या पथकाने केली.