रक्षाबंधनासाठी बहिणीकडे आलेल्या भावाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

तालुक्यातील पारळा येथील घटना

वैजापूर 

शेततळ्यात बुडाल्याने तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना तालुक्यातील तालुक्यातील पाराळा शिवारात १८ ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली.पवन प्रकाश सुरडकर (वय १८, रा. जुन्ना, ता. जामनेर, जि. जळगाव) असे घटनेतील मृत  तरुणाचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

                                 मृत : पवन सुरडकर

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पवन सुरडकर हा रक्षाबंधनासाठी पाराळा येथे त्याच्या बहिणीकडे आला होता. उन्हाळ्यात लावलेले कांदे विकून पोळ्याचा सण साजरा करण्यासाठी तो थांबला होता. दरम्यान शेततळ्यातील कडेला उभा असताना त्याचा पाय घसरला आणि तो पाण्यात बुडाला. घटना समजताच परिसरातील नागरिकांनी पवनला पाण्याबाहेर बाहेर काढले.  तातडीने त्याला शिऊर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्याला मृत घोषित केले. याप्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हवालदार किशोर आघाडे हे करीत आहेत. पवन सुरडकरच्या पश्चात आई-वडील व दोन बहिणी असा परिवार आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने बहिणीकडे आलेल्या भावावर काळाने घाला घातल्याने परिसरात शोककळा पसरली आहे.