संशयित चोरटा पोलिसांच्या ताब्यात
वैजापूर
चोरीच्या उद्देशाने आलेल्या चोरट्यांनी वृद्ध जोडप्याला जबर मारहाण केल्याची घटना तालुक्यातील भायगाव शिवारात (ता.२५) रोजी रात्रीच्या सुमारास घडली. याप्रकरणी एका संशयिताला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सतीश ठोंबरे, यांचा शेतीव्यवसाय असून ते भायगाव शिवारातील शेत गट क्र. २०३ मधील शेतात रहिवसास असून त्यांचा मोठा भाऊ उध्दव ठोंबरे हा देखील त्यांच्या शेजारीच राहतो. त्यांची आई लिलाबाई (वय-६०) व वडील प्रकाश ठोंबरे (वय-६५) भायगाव (गावात) राहतात. आई-वडील राहत असलेल्या घराच्या बाजूला त्यांचा मुलगा उध्दव याचे मंडप डेकोरेशनचे साहित्य ठेवण्याचे दुकान आहे. दरम्यान गुरुवारी रात्री सव्वा अकरा वाजता सतीश घरी असताना त्यांना गावातील एकाचा फोन आला व सांगितले की, 'तुझ्या आई वडिलांना चोरांनी जास्त मारहाण केली आहे तु लवकर भायगाव (गावात) ये. ही माहिती मिळताच सतीश लगेच गावात पोहचले. यावेळी त्यांना घरा समोर लोकांची गर्दी जमा झालेली दिसली. त्यानंतर त्यांनी घरात जाऊन बघितले असता त्यांची आई लिलाबाई व वडील प्रकाश यांच्या डोक्याला जबर मारहाण होऊन दोघे जमिनीवर पडलेले दिसले. लगेचच ते एका वाहनातून आई-वडिलांना उपचार करण्यासाठी रुग्णालयात घेऊन जाण्यासाठी निघाले. रस्त्यात त्यांच्या आईने त्यांना सांगितले की, " मी व तुझे वडील असे आम्ही घरात झोपलेलो असतांना अंदाजे रात्री सव्वा अकरा वाजेच्या सुमारास कोणीतरी घराचा दरवाजा वाजवला त्यावेळी मला वाटले की, उध्दव (मुलगा) हा दुकानात साहित्य ठेवण्यास आला असावा असे वाटल्याने मी घराचा दरवाजा उघडला त्याच वेळी एका इसमाने अचानक माझ्या डोक्यात लोखंडी वस्तु मारली त्यामुळे मी खाली पडले त्यानंतर त्याच इसमाने तुझ्या वडिलांना देखील डोक्यात मारहाण केली व त्यानंतर त्या इसमाने माझ्या गळ्यातील सोन्याची मणी मंगळसुत्राची पोत बळजबरीने हिसकावुन तो तेथुन पळुन गेला' असे सांगितले. यानंतर त्यांना येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र प्रथमोपचार करून पुढील उपचारासाठी त्यांना शहरातील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. याप्रकरणी सतीश ठोंबरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरुद्ध त्यांच्या आईचे ३० हजार रुपयांचे मंगळसूत्र हिसकावून मारहाण केल्याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अन् चोरट्याची 'डब्बा पार्टी'..
दरम्यान गुरुवारी दुपारी घटनेतील तिघा चोरट्यांनी भायगाव येथील एका दुकानातून खाण्यासाठी चिवडयाचे पाकीट व सात ते आठ ब्लेडस खरेदी केल्याची परिसरातील नागरिकांचे म्हणणे आहे. घटना घडण्याअगोदर एका ठिकाणी एका झोपडीत घुसून रात्री अकरा वाजेच्या सुमारास त्यांनी त्या झोपडीतून खिचडी व खाण्याचे इतर साहित्य बाहेर काढून शेतातच 'डब्बा पार्टी' केली.
आणखी एका ठिकाणी करत होते चोरीचा प्रयत्न...
या घटनेनंतर गावातच आणखीन एका ठिकाणी तिघे चोरटे चोरीचा प्रयत्न करत असताना परिसरातील नागरिकांच्या लक्षात आले. परंतु आलेल्या लोकांची चाहूल लागताच चोरट्यानी घटनास्थळाहुन धूम ठोकली.
संशयित चोरटा पोलिसांच्या ताब्यात...
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले, पोलिस उपनिरीक्षक नितीन नलावडे, पोलिस हवालदार विशाल पडळकर आदींच्या पथकाने घटनास्थळी जाऊन पाहणी केली. दरम्यान शुक्रवारी पहाटे गावातील महादेव मंदिरात गावकरी दर्शनासाठी एकत्र आले. यावेळी त्यांना मंदिरावर एकजण झोपलेला दिसून आला. त्याला झोपेतून जागे करून त्याचे नाव-गाव विचारण्यात आले. परंतु त्याने उडवा-उडवीची उत्तरे देण्यास सुरूवात केली. अखेर गावकऱ्यांनी त्याला वैजापूर पोलिसांच्या ताब्यात दिले. या घटनेच्या पार्श्वभूमीवर परिसरात कुणीही संशयितरित्या आढळून आल्यास नागरिकांनी तात्काळ ही माहिती पोलिसांना द्यावी. शिवाय शेतकऱ्यांच्या शेतात शेतमजुरी करण्यासाठी येणाऱ्या परप्रांतीय अथवा अनोळखी लोकांची संपूर्ण माहिती संकलित करून पोलिस ठाण्यात शेतकऱ्यांनी द्यावी असे आवाहन पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी केले आहे.


Social Plugin