कर्मचाऱ्याच्या 'आर्थिकलीले''ने वैजापूर भूमिअभिलेख कार्यालय पुन्हा एकदा चर्चेत...


कार्यालयातील कर्मचाऱ्याच्या 'आर्थिक लीलेला' वैतागून नागरिकांना तक्रार दिली.

वैजापूर

येथील भूमिअभिलेख कार्यालय नेहमी वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असते. गुरुवारी पुन्हा एकदा एका कर्मचाऱ्याच्या 'आर्थिकलीले'मुळे हे कार्यालय चर्चेत आले आहे.

भूमी अभिलेख कार्यालयाकडून शेतकरी आणि सामान्य नागरिकांना न्याय मिळायला हवा, तेच कार्यालय आज एका कर्मचाऱ्याच्या 'आर्थिकलीले' मुळे भ्रष्टाचार, दलाल आणि बेकायदेशीर वसुलीचे केंद्र बनत असल्याचे चित्र आहे. वैजापूर भूमी अभिलेख कार्यालयात कार्यरत काझी नावाच्या एका कर्मचाऱ्यावर पदाचा गैरवापर केल्याचे गंभीर व धक्कादायक आरोप समोर आले आहेत. सरकारी फाईली घरी नेणे, नागरिकांची कामे मुद्दाम थांबवून लाच वसूल करणे आणि दलालांच्या नेटवर्कद्वारे कार्यालयात काम घेऊन येणाऱ्या नागरिकांची आर्थिक लूट करणे असे आरोप त्यांच्यावर करण्यात आले आहेत. या पार्श्वभूमीवर भाजपचे जिल्हा महासचिव हाफिज काकर, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) शहराध्यक्ष जुबेर चाऊश यांनी भूमी अभिलेख उपअधीक्षकांना तक्रार दिली या तक्रारीत म्हटले आहे की, नागरिकांच्या जमिन मोजणी, नकाशा दुरुस्ती, नामांतरण आणि वारस नोंदणी यांसारख्या संवेदनशील प्रकरणांमध्ये काझींची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. याचाच फायदा घेत ते अर्जदारांच्या संचिका जाणून-बुजून दाबून ठेवतात. संचिकांवर 'वजन' ठेवल्याशिवाय त्या पुढे सरकविल्या जात नाही, तर पैसे देणाऱ्यांचे काम मात्र 'सुम',मध्ये करून दिले जाते. दरम्यान कार्यालयातील जबाबदार अधिकाऱ्यांनी चौकशी केली असता काझी हे कोणतीही पूर्वसूचना न देता कार्यालयात गैरहजर असल्याचा प्रकार देखील गुरुवारी समोर आला. यावर उपअधीक्षक विजय संधानशिव यांनी या अगोदरही आपल्याकडे तोंडी तक्रारी आल्या होत्या. मात्र आता लेखी तक्रार आल्याने काझी यांना कारणे दाखवा नोटीस बजावून तीन दिवसांत खुलासा मागितला जाणार आहे. यानंतर वरिष्ठ स्तरावर तक्रार पाठवून कारवाई केली जाईल असे सांगितले आहे.


सरकारी फाईली घरी !!

सर्वात गंभीर आरोप म्हणजे काझी हे सरकारी फाईली कार्यालयाबाहेर नेऊन आपल्या घरी ठेवतात. हे केवळ सरकारी नियमांचे उल्लंघन नसून यामुळे कागदपत्रांमध्ये छेडछाड आणि नोंदींमध्ये हेराफेरी होण्याचीही शक्यता निर्माण होते. असा सूत्रांचा दावा आहे . दरम्यान अनेक फाईली आजही काझी यांच्या घरीच आहेत. त्यामुळे तातडीने छापेमारी करण्याची मागणी करण्यात आली आहे.


डिजिटल लाचखोरीचा खेळ..

भ्रष्टाचाराची पद्धत आता डिजिटल झाली आहे. दुर्गानगर परिसरातील एका प्रकरणात फोन-पेच्या माध्यमातून लाच स्वीकारल्याचा आरोप करण्यात आला असून, डिजिटल व्यवहाराचे पुरावेही निवेदनासोबत सादर करण्यात आले आहेत.


दलालांचे जाळे...

कार्यालयात येणाऱ्या जवळपास प्रत्येक अर्जदारामागे काझींचा एखादा एजंट कार्यरत असल्याचा आरोप आहे. हे एजंट थेट अर्जदारांच्या घरी जाऊन किंवा फोनवरून पैशांची मागणी करतात. ‘दाम द्या, काम करा’ या उघड धोरणामुळे कार्यालयात कामानिमित्त येणारे नागरिक हैराण आहेत.