वैजापूर
कत्तलीसाठी गोवंशाची अवैध वाहतूक करणाऱ्यांविरुद्ध वैजापूर पोलिसांनी ०२ मे रोजी कारवाई करून पशुधन व वाहनासह एकूण पाच लाख ६० हजारांचा मुद्देमाल हस्तगत केला. तालुक्यातील लासुरगाव शिवारात पहाटेच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली. या प्रकरणी कलीम लालू शेख व मुन्नामील मेहबूब कुरेशी ( दोघेही रा. छत्रपती संभाजीनगर) यांच्याविरुद्ध वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी पहाटे नागपूर-मुंबई महामार्गावर लासूरगाव शिवारात संशयास्पद वाहनातुन कत्तलीच्या उद्देशाने गोवंशाची अवैध वाहतूक करण्यात येत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या आधारे पथकाने माहितीतील ठिकाणी जाऊन वाहन (एम.एच.२० जी.सी.४११३) अडविले. त्यात चार बैल व एक गाय यांची कत्तलीच्या उद्देशाने अमानुषपणे वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. दरम्यान वाहनातील दोघांना पथकाने त्यांचे नाव-गाव विचारले असता त्यांनी त्यांचे नाव कलीम शेख व मुन्नामील कुरेशी (रा. छत्रपती संभाजीनगर) असल्याचे सांगत हे पशुधन आपण वैजापूर तालुक्यातीलच खंडाळा येथील फिरोज कुरेशी यांच्याकडून घेऊन मालक जावेद खान (रा.बेगमपुरा, छत्रपती संभाजीनगर) यांच्याकडे सोडण्यासाठी जात असल्याची कबुली दिली. या प्रकरणी पोलिस अंमलदार रणजीत चव्हाण यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून गुन्ह्याचा अधिक तपास हवालदार किरण गोरे हे करीत आहेत.



Social Plugin