वैजापूर

मागील  वर्षभरात वैजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिलांच्या बेपत्ता होण्याच्या घटनांमध्ये चिंताजनक वाढ झाल्याचे समोर आले आहे. १ जानेवारी २०२५ ते मार्च २०२६ या कालावधीत तब्बल ८१ महिला वैजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतून बेपत्ता झाल्या असून यापैकी ७४ महिलांचा शोध लावण्यात पोलिसांना यश आले आहे. दरम्यान अशा घटनांत मुलीपेक्षा महिला बेपत्ता होण्याचा टक्का वाढला आहे.

या पार्श्वभूमीवर या घटना कौटुंबिक व सामाजिक व्यवस्थेला आत्मचिंतन करायला भाग पाडणाऱ्या आहेत. मागील काही दिवसांत वैजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत पुरुषांच्या तुलनेत महिलांच्या बेपत्ता होण्याचे प्रमाण अधिक असल्याचे दिसून येत आहे. यामागे कौटुंबिक वाद, आर्थिक अडचणी, प्रेमसंबंध, तसेच फसवणुकीच्या घटनांचा मोठा वाटा असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. काही प्रकरणांमध्ये महिलांना लग्नाच्या बहाण्याने फसवले जात असल्याचेही तपासात आढळले आहे. दरम्यान अल्पवयीन मुलींच्या अपहरणाच्या घटनाही गंभीर चिंतेचा विषय ठरत आहेत. मागील १५ महिन्यांत वैजापूर पोलिस ठाणे हद्दीतून २१ अल्पवयीन मुलींचे अपहरण झाल्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. यापैकी २० मुलींची सुखरूप सुटका करण्यात पोलिसांना यश आले असून एका मुलीचा शोध अद्याप सुरू आहे. बेपत्ता महिला किंवा अपह्रत मुलींचे आकड्यांची तुलना केल्यास मागील वर्षभरात वैजापूर पोलिस ठाणे हद्दीत मुलीपेंक्षा तिप्पट महिला बेपता झाल्या. अर्थात या घटनांच्या तपास प्रक्रियेत पोलिस प्रशासनाने  गांभीर्याने लक्ष देत विशेष पथके स्थापन करून  तांत्रिक विश्लेषण, गुप्त बातमीदार, सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन यांचा वापर करून शोधमोहीम राबवत सोशल मीडियाच्या माध्यमातूनही हरवलेल्या महिला व मुलींचा शोध लावण्यात पोलिसांना मोठ्या प्रमाणात यश आले. दरम्यान तज्ज्ञांच्या मते समाजात वाढती असुरक्षितता, डिजिटल माध्यमांचा गैरवापर आणि युवक-युवतींमध्ये वाढते आकर्षण यामुळे अशा घटनांमध्ये वाढ होत असल्याचे दिसून येते. त्यामुळे पालकांनी मुलांवर लक्ष ठेवणे, अनोळखी व्यक्तींशी संपर्क टाळणे, तसेच परिसरात संशयास्पद हालचाली करणाऱ्यांची माहिती पोलिसांना देणे गरजेचे आहे. तर पोलिस प्रशासनाच्या सतर्कतेसोबतच नागरिकांच्या सहकार्यानेच अशा घटनांवर आळा घालता येईल असा विश्वास पोलिसांच्यावतीने व्यक्त करण्यात आला आहे.

पोलिसांकडून विशेष मोहिम...

सन २०२१ ते २०२५ या पाच वर्षाच्या कालावधीत १८ बेपत्ता महिलांचा शोध प्रलंबीत होता.  या पार्श्वभूमीवर वैजापूर पोलिसांनी ७ महिलांचा शोध लावत कुटुंबाच्या स्वाधीन केले असून या कालावधीतील उर्वरित बेपत्ता महिलांच्या तपासासाठी पोलिस प्रयत्न करत आहेत.

पुरुषांपेक्षा महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण जास्त

मागील वर्षभरात प्रौढ पुरुष व मुलांपेक्षा महिला व मुलींचे बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढले आहे. या घटनांत शहरापेक्षा ग्रामीण भागाचा टक्का जरा जास्तच आहे. मागील वर्षभरात प्रौढ पुरुष व मुलांच्या तुलनेत महिला व मुली अपहरणाचा प्रमाण वाढले आहे. बहुतेक घटनांमध्ये तपास लावून पोलिसांनी महिला व मुली कुटुंबियांच्या स्वाधीन केल्या आहेत. 


सध्या टी. व्ही.मालिकेचे अनुकरण व सोशल मीडियाचा वापर वाढल्याने अनेकांच्या वैचारिक पातळीत झपाट्याने बदल होऊन अशा घटना घडतात. या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिस प्रशासन तत्पर आहे. तरी देखील प्रत्येक कुटुंब प्रमुखांनी आपले पाल्य कुणाच्या संपर्कात असतात ? त्यांच्या मित्र मैत्रिणी कोण ? त्यांच्याकडील मोबाईल वापरा दरम्यान ते कोणते कंटेंट बघतात ? याबाबत वेळोवेळी दखल घेत जागरुक असायला हवे. वेळप्रसंगी कुटुंब प्रमुखांनी पाल्यांचे पालक होण्याऐवजी त्यांचे मित्र होऊन समुपदेशन करावे.

सत्यजित ताईतवाले, पोलिस निरीक्षक

पोलिस ठाणे, वैजापूर