वैजापूर 

बाजारपेठेत खरेदीदरम्यान महिलेचा हरवलेला ऐवज  वैजापूर पोलिसांनी तत्परता दाखवून तांत्रिक तपासाच्या आधारे शोध लावून महिलेला सुपूर्द केला. ०८ मे रोजी सायंकाळी उशिरा वैजापूर पोलिसांनी ही कामगिरी केली. पोलिसांच्या तत्परतेमुळे त्यांच्या कामगिरीचे कौतुक होत आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, ज्योती  होन या तालुक्यातील शिवराई येथील रहिवासी आहेत. शुक्रवार (ता.८ मे) रोजी दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास वैजापूर शहरातील आंबेडकर चौक ते झगडा फाटा परिसरात असलेल्या बाजारपेठात त्या साहित्य खरेदी करत होत्या. यावेळी त्यांचे रोख रक्कम व काही दागिने असलेले पॉकेट हरवले. त्यांनी तत्काळ वैजापूर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या आदेशाने सीसीटीव्ही अंमलदार किरण रावते यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. तपासादरम्यान झगडा फाटा येथे महिलेचे पॉकेट पडल्याचे पोलिसांना दिसून आले. तसेच ते पॉकेट मोटारसायकलवरील (एम.एच.१७ सी.पी. १२६६) व्यक्तीस सापडल्याचे समजले. लगेचच पोलिसांनी 'त्या' वाहन क्रमांकाच्या आधारे संबंधित व्यक्तीचा शोध घेतला.  लहानू जाधव (रा. खोपडी, ता. कोपरगाव) यांनी ते पॉकेट सापडल्याचे सांगितले. त्यांनी पॉकेटमधील वस्तू न पाहता ते पोलिस ठाण्यात जमा करण्यासाठी ठेवले असल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिस अंमलदार किरण रावते यांनी तत्काळ घटनास्थळी जाऊन लहानू जाधव यांच्याकडून पॉकेट ताब्यात घेतले व पोलीस ठाण्यात आणले. ज्योती होन यांच्या उपस्थितीत पॉकेट उघडून पाहिले असता त्यामध्ये १० हजार ५०० रुपये रोख रक्कम, चांदीचे पैंजण आणि घराच्या चाव्या मिळून आल्या. त्यानंतर सर्व साहित्य ज्योती होन यांच्या ताब्यात देण्यात आले.