वैजापूर
जलसंपदा मंत्री राधा कृष्ण विखे यांच्या नेतृत्वाखाली गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्राचे २७ एप्रिल रोजी वैजापूरात जोरदार स्वागत करण्यात आले. महाराष्ट्रातील पाच तर मध्यप्रदेश येथील दोन जिल्ह्यात ही जलयात्रा पोहचणार आहे.
जलसंवर्धन होऊन महाराष्ट्र दुष्काळमुक्त व्हावा या मुख्य हेतूने २५ ते २९ एप्रिल दरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर सोमवारी या यात्रेचा रथ वैजापूरात दाखल झाला. या वेळी जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे, राज्यसभेचे खासदार रामराव वडकुटे, आमदार गोपीचंद पडळकर, वैजापूरचे नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, सदाभाऊ खोत, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे, शिल्पा परदेशी यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती. या प्रसंगी बोलताना जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे यांनी सांगितले की, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी त्यांच्या काळात कन्याकुमारी ते वाराणसीपर्यंत जलसंवर्धनाची अनेक कामे केली. त्यांचाच आदर्श घेऊन या पुढील काळात आपण देखील पाण्याचे संवर्धन करायला हवे. मी जलसंपदा खात्याचा कारभार हाती घेतला तेंव्हा गोदावरी खोऱ्यासाठी ५५ टीएमसी इतके पाणी मंजूर होते. मात्र यापुढील काळात हा आकडा वाढून ७८ टीएमसी इतके पाणी या खोऱ्यासाठी मिळणार आहे. या शिवाय या वर्षीच्या डिसेंबर महिन्यापर्यंत ९० हजार कोटी रुपये इतक्या खर्चासह नदीजोड प्रकल्पाला सुरुवात होणार आहे अशी माहिती दिली. या वेळी नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशी यांनी शहरातील नारंगी मध्यम प्रकल्पासाठी पाण्याची कायमस्वरूपी तजवीज करावी, शनि देवगाव उच्च पातळी धरणाचे काम पूर्णत्वास न्यावे यासह इतर मागण्या मंत्री राधाकृष्ण विखे यांच्याकडे केल्या. या कार्यक्रमाला उपनगराध्यक्ष रियाज शेख, बाजार समितीचे सभापती कल्याण दांगोडे, शेख अकिल, नगरसेवक विशाल संचेती, दशरथ बनकर, ज्ञानेश्वर जगताप, शैलेश चव्हाण,कैलास पवार, विनोद राजपूत, गणेश खैरे, दिनेश राजपूत, प्रेम राजपूत आदींची उपस्थिती होती.
आमच्या लोकांना काहीच माहिती नाही...
आपल्या भाषणात बोलताना मंत्री विखे यांनी नांमकाचे कार्यकारी अभियंता प्र.पु. संत यांना व्यासपीठावरच उभे करून आपल्या विभागाचे किती कर्मचारी अप-डाउन करतात व किती लोक येथे राहतात ? अशी विचारणा केली. या शिवाय तुम्हाला तुमच्या हद्दीतील चाऱ्या किती किलोमीटर आहेत ? हे देखील माहित नाही असे म्हणून यावर मी लवकरच उपाययोजना करणार आहे असा इशारा देखील दिला.

Social Plugin