वैजापूर
सोशल मीडियावर झालेली एक ओळख हळूहळू संवादात बदलली, संवादाचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले आणि अखेर दोघांनी एकत्र संसार थाटण्याचा निर्णय घेतला. मात्र सुरुवातीला आश्वासनांनी भरलेली ही प्रेमकहाणी पुढे वेगळ्याच वळणावर गेली. तीन मुलींच्या भवितव्याची चिंता असलेल्या विधवा महिलेचा विश्वास संपादन करून तिच्यासोबत राहणाऱ्या तरुणाने दारूच्या नशेत त्रास देत मारहाण केल्याचा आरोप महिलेने केला आहे. अखेर त्रस्त झालेल्या महिलेने वैजापूर पोलिस ठाणे गाठत आपली कैफियत मांडली.
मिळालेल्या माहितीनुसार, इन्स्टाग्रामवर झालेल्या ओळखीपासून या कथेला सुरुवात झाली. दोघांमध्ये सुरुवातीला सोशल मीडियावरून संवाद सुरू झाला. सुमारे दोन महिने दोघांचे नियमित चॅटिंग सुरू होते. या संवादातून दोघांमध्ये जवळीक वाढली आणि त्याचे रूपांतर प्रेमसंबंधात झाले. यानंतर संबंधित तरुण महिलेच्या घरी गेला. त्याने आपली कौटुंबिक परिस्थिती चांगली व समृद्ध असल्याचे सांगत महिलेचा विश्वास संपादन केला. महिला विधवा असून तिच्यावर तीन मुलींची जबाबदारी असल्याने त्यांच्या भवितव्याची तिला चिंता होती. याच पार्श्वभूमीवर तरुणाने ‘मी तुझ्या तिन्ही मुलींचा सांभाळ करेन,’ असे आश्वासन दिल्याचे महिलेने पोलिसांना सांगितले. तरुणाच्या या आश्वासनावर विश्वास ठेवून महिला त्याच्यासोबत राहण्यास तयार झाली. त्यानंतर दोघे वैजापूर शहरातील खंडोबानगर परिसरात एकत्र राहू लागले. सुरुवातीचा काळ सुरळीत गेला. मात्र, कालांतराने तरुण दारूच्या आहारी गेल्याचे महिलेच्या लक्षात आले. दारू पिऊन घरी आल्यानंतर तो शिवीगाळ करून त्रास देऊ लागला. पुढे त्याने मारहाण करण्यासही सुरुवात केल्याचा आरोप महिलेने केला आहे.
प्रेमाच्या आश्वासनानंतर त्रासाचा अध्याय..
तरुणाचे वागणे दिवसेंदिवस बदलत गेल्याने महिलेच्या अडचणी वाढल्या. अखेर हे जोडपे महिलेच्या आईच्या घरी वास्तव्यास गेले. मात्र, ठिकाण बदलले तरी तरुणाकडून होणारा त्रास थांबला नाही. वारंवार होणाऱ्या त्रासाला कंटाळून अखेर महिलेने पोलिस ठाण्यात धाव घेतली. दरम्यान, सोमवारी दुपारी बाराच्या सुमारास एक तिशीतले हे जोडपे एका वृद्ध महिलेसह वैजापूर पोलिस ठाण्यात दाखल झाले. पोलिस ठाण्यात पोहोचताच दोघांमध्ये वाद सुरू झाला. तरुण महिलेला समजावण्याचा प्रयत्न करीत होता; मात्र महिला ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हती. पोलिस कर्मचाऱ्याने मध्यस्थी करून ठाण्यात वाद न घालता काही तक्रार असल्यास ती लेखी स्वरूपात देण्याचे सांगितले. त्यानंतर संपूर्ण प्रकरणाचा उलगडा झाला. महिलेने संबंधित तरुणाविरुद्ध आपली तक्रार मांडली. पोलिसांनी महिलेचा जबाब नोंदवून घेतला असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
विश्वास ठेवताना सावधगिरी गरजेची..
सोशल मीडिया हे संवादाचे प्रभावी माध्यम असले, तरी ऑनलाइन झालेली प्रत्येक ओळख विश्वासार्ह असेलच असे नाही. विशेषतः वैयक्तिक नातेसंबंध निर्माण करताना समोरच्या व्यक्तीची कौटुंबिक पार्श्वभूमी, वर्तन आणि वास्तविक परिस्थितीची पुरेशी माहिती घेणे गरजेचे आहे. या घटनेतून सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींशी नाते जोडताना भावनिक निर्णय घेण्यापूर्वी योग्य ती पडताळणी आणि सावधगिरी बाळगण्याचा संदेश मिळतो.
“सदरील प्रकरण पोलिस ठाण्यात आले होते. महिलेचा जवाब नोंदविण्यात आला असून पुढील कारवाई करीत आहोत.”
— सत्यजित ताईतवाले, पोलिस निरीक्षक, वैजापूर

Social Plugin