वैजापूर

'कमी किंमतीत बकऱ्या घेऊन देतो' अशी थाप मारून भामट्याने वृद्धाला अडीच लाख रुपयांना गंडविल्याची घटना नुकतीच समोर आली आहे. या प्रकरणी राकेश भोसले (रा.सोलापूर, पूर्ण नाव माहित नाही) याच्याविरुद्ध वैजापूर पोलिसांत फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रशीद खान चांद खान (६०), रा.पिंपळी ता. परभणी) हे मजुरी करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. दरम्यान एक महिण्यापुर्वी त्यांचा मुलगा सादीक खान याची रेल्वे मध्ये प्रवास करत असताना राकेश भोसले नावाच्या एका मुलासोबत ओळख झाली. त्यावेळी राकेश त्यांच्या मुलास म्हणाला  की, 'मी सोलापुरचा राहणारा असुन मी बक-या खरेदी विक्रीचा व्यवसाय करतो तुम्हाला बक-या घ्यायच्या असल्यास मला कळवा' असे सांगुन त्याने त्याला त्याचा मोबाईल क्रमांक दिला.  त्यानंतर त्यांच्या मुलाच्या फोनवरुन रशीद खान यांचे राकेश भोसले याच्याशी सुमारे महिनाभर संभाषण झाले. या काळात त्यांचा राकेशवर विश्वास बसला. ०३ एप्रिल रोजी राकेश भोसले हा सोलापुरहुन वैजापूरला आला होता. त्यावेळी त्याने रशीद खान यांना फोन करुन सांगितले की, 'मी वैजापुरला आलो आहे तुम्ही पैसे घेवुन वैजापुरला या मी तुम्हाला बक-या दाखवतो व तुम्हाला कमी किंमतीमध्ये बक-या घेवुन देतो' त्याने असे सांगितल्याने रशीद हे त्यांच्या पत्नीसोबत अडीच लाख रुपये घेऊन दुपारी एक  वाजेच्या सुमारास वैजापूर शहरातील येवला नाका परिसरात आले. या ठिकाणी त्यांना राकेश भोसले भेटला. त्याने त्यांना त्याची मोटार सायकलने  (एम.एच. १६ बी.जी. ८८३९) येवला रोडने नांदगाव शिवारातील एका हॉटेलच्या पाठीमागील शेतात घेवुन गेला. तिथे पोहचताच राकेश त्यांना म्हणाला की, 'तुमच्याकडे असलेले अडीच लाख रुपये माझ्याकडे द्या व तुम्ही येथेच थांबा. मी बक-या शोधुन आणतो'  या शिवाय त्याने रशीद यांचा अकरा हजार रुपये किंमतीचा मोबाईलही त्यांच्याकडून घेतला व तिथून निघून गेला. बऱ्याच वेळ त्याची वाट बघितल्यानंतर तो परत न आल्याने रशीद यांनी त्यांच्या पत्नीच्या मोबाईलहून राकेशला संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र राकेशने स्वतःचा व त्यांचाही फोन बंद केल्याने त्यांचा संपर्क झाला नाही. या वेळी रशीद खान यांना आपली फसवणूक झाल्याची बाब लक्षात आली.