वैजापूर 

गंगापूर तालुक्यातील टाकळीवाडी येथील रहिवासी तथा सध्या वैजापूर पोलिस ठाण्यात पोलिस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत असलेले पवन सुंदर्डे यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (MPSC) डिसेंबर-२०२४ मध्ये झालेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करत पोलिस उपनिरीक्षक पदाला गवसणी घातली आहे.

राज्यातून सुमारे ३० हजार परीक्षार्थींनी ही परीक्षा दिली होती. दरम्यान लेखी परीक्षेनंतर २१ एप्रिल रोजी नवी मुंबई येथील कळंबोली येथे पार पडलेल्या मैदानी चाचणीतही पवन सुंदर्डे यांनी दमदार कामगिरी केली. राज्यभरातून सुमारे ३० हजार परीक्षार्थींनी ही परीक्षा दिली होती. त्यापैकी ६१५ उमेदवार उत्तीर्ण झाले असून सुंदर्डे यांनी राज्यात १०६ वी रँक मिळवून उल्लेखनीय यश मिळवले. २०१८ साली पोलिस दलात दाखल झालेल्या पवन सुंदर्डे यांनी अल्पावधीत कठोर परिश्रम आणि जिद्दीच्या जोरावर हे यश संपादन केले. त्यांच्या या यशाबद्दल वैजापूरचे आमदार रमेश बोरनारे, नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, पालिका मुख्याधिकारी भागवत बिघोत तसेच पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत.