वैजापूर
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेला प्रचाराचा धुरळा संपला आहे. दरम्यान या कालावधीत शिवसेना - भाजपमध्ये झालेली 'उचलटाक', उमेदवारांची कसरत, नेत्यांची धावपळीने ग्रामीण भाग ढवळून निघाला. उमेदवारांनी जिवाचे रान करीत मैदान गाजवले असले तरी कोण कुणाला 'धोबीपछाड' देणार? हे मात्र ७ फेब्रुवारी रोजी मतदानातून समजणार आहे. विशेषतः तालुक्यातील तालुक्यातील वांजरगाव गटात होणाऱ्या 'टाईट-फाईट' ने जिल्ह्याचे लक्ष वेधून घेतले असून कुणाचे पारडे जड? तर कुणाचे हलके? याबाबत समीकरणे जुळविण्यास सुरुवात झाली आहे.
जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानासाठी अवघ्या २४ तासांचा अवधी शिल्लक राहिला असून तालुक्यातील ८ गटात व १६ गणात सेना,भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षासह अपक्ष उमेदवारांच्या प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. ऐन निवडणूकीच्या तोंडावर झालेली भाजप-सेना युती व त्यानंतर या युतीत पडलेला मिठाचा खडा हा नेमका कोणत्या पक्षाच्या पथ्यावर पडतो ? याबाबत सध्यातरी कायस लावणे कठीण आहे. असे जरी असले तरी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका या उमेदवाराचा मतदारसंघात असलेला जनसंपर्क व केलेली लोकहिताचे कामे यावरच आधारित असतात. दरम्यान वांजरगाव गटात शिवसेनेचे उमेदवार बाबासाहेब पाटील जगताप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे (अजित पवार) पंकज ठोंबरे असा सामना रंगणार आहे. सेनेचे जिल्हाप्रमुख बाबासाहेब जगताप यांची सन-२००७ साली वैजापूर पंचायत समितीच्या सभापती पदी निवड झाली. मिळालेल्या संधीचे सोने करत याकाळात त्यांनी पंचायत समितीच्या बांधलेल्या नवीन इमारतीसह केलेली लोकाभिमुख कामे ही त्यांच्या भावी राजकीय कारकिर्दीसाठी महत्वाची ठरली. दरम्यान सन - २०१७ साली पार पडलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीत ते वांजरगाव गटातून शिवेसेनेकडून इच्छुकांच्या यादीत होते. मात्र ऐनवेळी या गटात त्यांना उमेदवारी नाकारल्याने पंकज ठोंबरे यांनी त्या निवडणुकीत एकतर्फी विजय मिळवला. यावेळी मात्र शिवसेनेचे बाबासाहेब पाटील जगताप यांचे ठोंबरें समोर तगडे आव्हान असणार आहे. सन - २०२४ मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत आमदार रमेश बोरनारे यांच्यासह बाबासाहेब पाटील जगताप यांचा गंगथडी भागात मतदारांशी आलेला संपर्क हा त्यांच्यासाठी 'प्रॅक्टिस बिफॉर द मॅच' ठरला आहे. याशिवाय ग्रामीण भागातील नागरिकांना प्रशासकीय दरबारी वेळोवेळी येणाऱ्या अडचणी सोडविणे, प्रशासकीय अधिकाऱ्यांवर असलेली जरब या देखील जगताप त्यांच्यासाठी जमेच्या बाजू ठरणार आहेत. तर पंकज ठोंबरे यांनी देखील मागील निवडणुकीत जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर परिसरात त्यांच्यापरीने जनसंपर्क वाढवत शक्य ती विकास कामे करण्याचा बऱ्यापैकी प्रयत्न केला आहे ही त्यांच्यासाठी सकारात्मक बाब ठरणार आहे. हे सर्व मुद्दे महत्वाचे असले तरी देखील याही निवडणुकीत 'व्हिटीमन एम' हा महत्वाचा मुद्दा ठरणार असून 'एकाकडून दोन तर दुसऱ्याकडून तीन' यावर देखील दोन्ही उमेदवारांना लक्ष केंद्रीत करावे लागणार आहे. दरम्यान या लढतीत राजकीय पक्ष ही बाब वगळल्यास अनुभव विरुद्ध तरुणाई असा हा सामना रंगणार असून या सामन्यात कोण बाजी मारणार ? यासाठी आणखीन काही तास वाट पहावी लागणार आहे.
वांजरगाव गटात २५ हजार ३४५ मतदार बजावणार निवडणुकीचा हक्क..
'व्हिटॅमिन एम' देखील ठरणार टर्निंग पॉईंट !!
या गटात जवळपास २५ हजार ३४५ मतदार असून यामध्ये विशिष्ट समुदायाचे सतराशे तर जवळपास याच बरोबरीत दलित मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. दरम्यान 'दुपार नंतर' होणारे मतदान हे कोणता उमेदवार आपल्या बाजूने 'वळवितो' हे 'व्हिटॅमिन एम' युक्त कॅल्क्युलेशनही तितकेच महत्त्वाचे ठरणार असून हा देखील निवडणुकीचा टर्निंग पॉईंट ठरणार आहे.




Social Plugin