वैजापूर तालुक्यातील 'त्या' गुरुजींची 'शाळाबाह्य' कामे चर्चेत...

'वजन कमी करा, वजन वाढवा' उत्पादनांची 'ते' शिक्षक करतात विक्री

वैजापूर

शासनाचे गलेलठ्ठ वेतन घेऊन तालुक्यातील काही गुरुजी वर्गात विद्यार्थ्यांना  शिकवण्याऐवजी 'वजन कमी करा, वजन वाढवा' अशा उत्पादनांची जोरदार जाहिरातबाजी करून घराघरांत जाऊन हे उत्पादन विक्री करताना दिसत आहे. त्यांच्या या 'शाळाबाह्य' कामामुळे  तालुक्यातील 'ते' शिक्षक सध्या चांगलेच चर्चेत आले आहेत. त्यामुळे पगार शासनाचा आणि काम खाजगी कंपनीचे अशी विचित्र परिस्थिती निर्माण झाली असून शिक्षण क्षेत्राची थट्टा होत असल्याची चर्चा नागरिकांत सुरू आहे.


गुरुजी  विद्यार्थी घडवणारे गुरू मानले जातात. परंतु  या गुरुजींनी आता एका विशिष्ट उत्पादनांची विक्री करण्याच्या 'धंद्या'त उड्या घेतल्या आहेत. वर्गखोल्या रिकाम्या ठेवून शिक्षकच दारोदार फिरून उत्पादनांची जाहिरात व विक्री करत असतील तर मुलांच्या शिक्षणाचे काय? हा प्रश्न पालकांच्या तोंडी आहे. ग्रामीण भागात तर अनेक शाळांत शिक्षकांचा तुटवडा असताना, असले प्रकार घडत असल्याने संताप व्यक्त होत आहे. शासन गुरुजी म्हणून पगार देते आणि खाजगी कंपन्यांनी त्यांचा ‘एजंट’ म्हणून वापर सुरू केला आहे. मग  शिक्षणव्यवस्था नेमकी कोणाच्या हातात आहे? अशी टीका होत आहे. शिक्षण विभागाने या प्रकाराकडे दुर्लक्ष न करता तातडीने चौकशी करावी, अशी मागणी जनतेतून होत आहे. गुरुजी केवळ अशी उत्पादने विक्री  करण्यातच अग्रेसर नाहीत तर शिक्षकी पेशातून वेगवेगळ्या धंद्यात कार्यरत आहेत. परंतु 'एजंट' हा शिक्का पक्का आहे. गुरुजी मंडळींकडून 'शाळाबाह्य' कामांच्या नावाने बोंबाबोंब सुरू असताना ही शाळाबाह्य कामे गुरुजींना कशी जमतात? हाही मोठा प्रश्न आहे. तालुक्यात शिक्षण क्षेत्राचा खेळ खंडोबा झालेला असताना गुरुजी मंडळी मात्र स्वतःच्या 'तुंबड्या' भरण्यात धन्यता मानत आहेत. ग्रामीण भागात शिक्षण क्षेत्राची अवस्था 'आधीच उल्हास अन् त्यात फाल्गुन मास' झालेली आहे. गुरुजी मंडळी मुख्यालयी राहत नाही, शाळा म्हणजे 'आओ जाओ घर तुम्हारा', वरिष्ठ अधिकारी शाळांकडे फिरकत नाही. त्यामुळे गुरुजींना रान मोकळे झालेले आहे. यामुळे 'मास्तरकी'बरोबरच गुरुजींनी अन्य धंद्यातही 'उड्या' घेतल्या आहेत.


गुरुजी दारोदार फिरताना, विद्यार्थी मात्र शिकवणीसाठी!


गावोगावी फिरून वजन कमी–वाढवण्याची औषधं विकण्यासाठी शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना भाग पाडलं जात आहे. त्यामुळे शाळा सुशिक्षित कर्मचाऱ्यांशिवाय रिकाम्या पडतात आणि विद्यार्थी मात्र शिकवणीसाठी भटकंती करतात. शासनाचा पगार घेणारा शिक्षकच जर खाजगी कंपनीचा सेल्समन झाला, तर पालकांनी आपल्या मुलांचं शिक्षण कोणाकडे सोपवायचं? हा प्रश्न अधिक गंभीर झाला आहे. दरम्यान गटशिक्षणाधिकाऱ्यांना याबाबत सर्व माहिती असतानाही ते म्हणतात की, 'अगोदर आमच्याकडे तक्रार करा, मग आम्ही कारवाई करतो.' त्यांच्या विधानाने ते अनभिज्ञ आहेत का? असा प्रश्नही पडतो. गुरुजींचे कारनामे माहिती असतानाही त्यांना तक्रारीची आवश्यकता काय? नाही म्हणायला एका सामाजिक कार्यकर्त्याने लेखी तक्रार करूनही त्यांनी काय कारवाई केली? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहेत. अधिकारी देखील पाहुण्यांच्या हाताने साप मारून स्वतः नामानिराळे राहण्याचा प्रयत्न करत आहेत. हेच यावरून सिद्ध होते. 


'त्या' गुरुजींचा वापर मार्केटिंगसाठी, पाठीशी नेमके कोण?


दारोदार फिरवून शिक्षकांकडून खाजगी उत्पादनांची विक्री करून घेणं. हा प्रकार साधा नाही. यामागे कोणाचं संरक्षण आहे? शिक्षण खात्यातीलच काही मंडळी अशा कंपन्यांना थेट किंवा अप्रत्यक्ष हाताशी धरत आहेत का? असा संशय व्यक्त केला जात आहे. जनतेचा पैसा खर्च करून शिक्षकांचा पगार दिला जातो. मग त्यांच्याकडून खाजगी कंपन्यांची मजुरी का? हा गंभीर प्रश्न अनुत्तरीत आहे.


गुरुजी मंडळी शासनाचे वेतन घेऊन जर एखाद्या कंपनीचे उत्पादन विक्री करीत असेल तर तक्रार आमच्याकडे करावी. शिक्षकांनी उत्तम दर्जाचे शिक्षण द्यावे. याकडे आमच्या आवर्जून लक्ष असते. मात्र काही शिक्षक असे काम करत असेल तर त्यांची लेखी तक्रार कुणी आमच्याकडे दिल्यास आम्हाला कारवाई करणे सोपे जाईल.


-हेमंत उशीर, गटशिक्षणाधिकारी, वैजापूर