विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
वैजापूर
जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या दशसूत्री कार्यक्रमांतर्गत 'कौशल्य विकास' या श्रेणीतील मातीकाम कौशल्यावर आधारित एक अनोखा उपक्रम जि.प. प्रशाला, शिवराई येथे दि. २५ व २६ ऑगस्ट रोजी राबवण्यात आला. या दोन दिवसीय कार्यक्रमात 'पर्यावरणपूरक गणपती तयार करण्याची स्पर्धा' मोठ्या उत्साहात पार पडली.
या स्पर्धेत विद्यार्थ्यांनी काळ्या मातीचा आणि शाडू मातीचा वापर करून आकर्षक गणेशमूर्ती तयार केल्या. मूर्तींना रंग देण्यासाठी त्यांनी नैसर्गिक रंगांचा वापर केला, ज्यामुळे पर्यावरणाचे रक्षण करण्याचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचला. या उपक्रमाचा मुख्य उद्देश विद्यार्थ्यांमध्ये कलाकौशल्य विकसित करणे आणि त्याचबरोबर पर्यावरणाबद्दल जागरूकता निर्माण करणे हा होता. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या कल्पनाशक्तीनुसार वेगवेगळ्या आकारांच्या आणि रूपांच्या गणेशमूर्ती साकारल्या. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना मातीकामाचे कौशल्य शिकता आले, तसेच आपल्या पारंपरिक सणांचे महत्त्व आणि ते साजरे करताना पर्यावरणाची काळजी कशी घ्यावी, याची जाणीव झाली. स्पर्धेच्या शेवटी तयार केलेल्या गणेशमूर्तींमधून उत्कृष्ट मूर्तींची निवड करून स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. विशेष म्हणजे, या वर्षी विद्यार्थ्यांनी स्वतः तयार केलेल्या या मूर्तीच घरात विराजमान करून पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचा संकल्प केला.
या उपक्रमासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख एस. टी. भुजाडे आणि पी. ए. कळसकर यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे हा उपक्रम यशस्वी झाला. मुख्याध्यापक ई.बी.गवळी, आर. झेड. परदेशी, आर.एस.पगारे, एस . के. तुंबारे, एस.एन. बलीकोंडवार, जी.बी.गायके, बी.व्हि.चौधरी सर, बी.टी. वानखडे, आर.ए.कळंके, वाय. डी. जेजुरकर, बी.ए.मुठे, बी. आर.पवार, आर. ए.कसबे व रामकृष्ण चव्हाण यांनी विद्यार्थ्यांच्या या कलात्मक प्रयत्नांचे कौतुक केले. असा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत नाही, तर समाजामध्येही पर्यावरणपूरक सण साजरे करण्याची प्रेरणा देतो असे मत मान्यवरांनी यावेळी व्यक्त केले.
Social Plugin