वैजापूरच्या कानाकोपऱ्यात गणरायाचे हर्षोल्हासात स्वागत

ढोलताशांच्या गजरात बाप्पा विराजमन

वैजापूर
रिद्धी-सिद्धीची देवता 'श्री' गणेशाची शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागात ढोल ताश्यांच्या गजरात स्थापना करण्यात आली.  बुधवार (ता.२७) रोजी दुपारपर्यंत वैजापूर तालुक्यातील जवळपास १०२ गणेश मंडळांनी 'श्री' स्थापनेसाठी पोलिस प्रशासनाकडे ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज दाखल करण्याची  प्रक्रिया पार पाडली  होती.


सालाबादप्रमाणे याही वर्षी वैजापूर शहरासह तालुक्यात  गणरायाचे मोठ्या हर्षोल्हासात स्वागत करण्यात  आले.



बुधवार सकाळ पासूनच शहरातील मुख्य बाजार पेठात
गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी बाल गोपाळांंसह थोरा मोठ्यांंची मोठी गर्दी होती. दुपारनंतर बहुतेक गणेश मंडळानी 'श्री' स्थापना करण्यास सुरुवात केली.


दरम्यान दुपारपर्यंत वैजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीत शहरात ३० व ग्रामीण भागात २१, शिऊर हद्दीत ४० व विरगाव पोलिस ठाणे हद्दीत २२ असे एकूण १०२ गणेश मंडळांनी श्री स्थापनेसाठी ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज केले आहेत. यामध्ये आणखीन वाढ होणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. गणेश उत्सव काळात  सर्व गणेश मंडळांनी रक्तदान, निसर्गपुरक व शालेय विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिक विषय संलग्न उपक्रम राबवावेत असे आवाहन आमदार रमेश बोरनारे व जिल्हा बँकेचे संचालक डॉ दिनेश परदेशी यांनी केले आहे.


'एक गाव एक गणपती'

 
'एक गाव एक गणपती' संकल्पनेतून बुधवार दुपारपर्यंत वैजापूर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ५९ गावांपैकी  ७ 
गावांंत शिऊर हद्दीतील ६३ गावांपैकी ३९ तर वीरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ४३ गावांपैकी २० गावांत
गणरायाच्या स्थापनेसाठी ऑनलाइन व ऑफलाईन पद्धतीने अर्ज प्रस्तावित असल्याची माहिती पोलिस प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.