वैजापूर 

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार करणाऱ्या एकाविरुद्ध २१ मे रोजी वैजापूर पोलिस ठाण्यात बलात्कारासह, अट्रोसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला. गोकुळ शिवाजी बावचे (रा.पानवी खंडाळा,ता.वैजापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  घटनेतील पीडित २३ वर्षीय तरुणीने दिलेल्या फिर्यादीनुसार, ती मागील दोन वर्षांपासून शहरातील एका फार्मसी महाविद्यालयात डी-फार्मसीचे शिक्षण घेत होती. तसेच येथील एका खासगी रुग्णालयात अर्धवेळ (पार्टटाईम) परिचारिका (नर्स) म्हणून काम करत होती. दरम्यान ८ फेब्रुवारी २०२५ रोजी उपचारासाठी रुग्णालयात आलेला गोकुळ बावचे याच्याशी तिची ओळख झाली. त्यानंतर दोघांमध्ये फोनवर बोलणे सुरू झाले आणि भेटीगाठी वाढत गेल्या. या दरम्यान गोकुळ बावचे हा तरुणीला अनेकदा शहरातील ‘यम्मी-टम्मी’ हॉटेलमध्ये भेटण्यासाठी बोलावत होता. याच काळात दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले.  १० जुलै २०२५ रोजी गोकुळने तिला लाडगाव रोडवरून रोटेगाव येथील एका लॉजमध्ये नेले आणि आपण लग्न करू अशी थाप मारून तिच्यासोबत शरीरसंग केला. या शिवाय जुलै २०२५ ते फेब्रुवारी २०२६ या कालावधीत गोकूळने तिला अनेकदा लॉजमध्ये बोलावून शरीरसंग केला. या दरम्यान तरुणीने त्याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने वेळ मागत तिला उडवाउडवीचे उत्तरे राहिला. त्या नंतर एप्रिल व मे महिन्यात देखील त्याने लग्नाच्या बहाण्याने तिच्या इच्छेविरुद्ध जबरदस्तीने तिच्यासोबत शरीरसंग केला. या प्रकरणी पीडितेच्या तक्रारीवरून वैजापूर पोलीस ठाण्यात गोकुळ बावचे याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.