वैजापूर
अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या वाळु तस्कराविरुद्ध कारवाई करण्यासाठी निघालेल्या महसुल पथकाच्या चार चाकी वाहनावर वाळूने भरलेला हायवा चढवून प्राणघातक हल्ला केल्याची घटना १९ मे रोजी रात्रीच्या सुमारास तालुक्यातील जांबरखेडा फाटा येथे घडली. या घटनेमुळे महसुल प्रशासनात मोठी खळबळ उडाली असून वाळु तस्कराविरुद्ध शिऊर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवनाथ विश्वनाथ लंबे (रा. जांबरखेडा, ता. वैजापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरसिंग बावनकर हे तालुक्यातील मांडकी तर केदार जोशी हे लाखणीचे तलाठी आहेत. या दोघांचीही अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या पथकात नेमणूक करण्यात आली आहे. बुधवारी मध्यरात्री हे दोघेही कारने (एमएच ३५ एआर ०४६१) जांबरखेडा-लाखनी रस्त्यावर गस्त करत असताना त्यांना समोरून संशयितरित्या वाळुने भरलेला हायवा (२० जीझेड ६७०६) येताना दिसला. यावेळी त्यांनी चालकाला वाहन थांबविण्याचा इशारा केला. मात्र काही समजण्याच्या आत हायवा चालकाने थेट कर्मचाऱ्यांच्या वाहनावर गाडी घालून त्यांची कार जवळपास ५० फूट फरफटत नेली. मात्र सीट बेल्ट बांधलेले असल्याने या घटनेत दोघेही कर्मचारी बचावले. काही सेकंदांचा हा थरार दोघांच्याही जीवावर बेतू शकला असता. मात्र सुदैवाने दोघेही यात थोडक्यात बचावले. या घटनेमुळे वैजापूर तालुक्यातील वाळु माफियांची वाढती दहशत हा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. प्रशासनाची कारवाई रोखण्यासाठी आता थेट सरकारी कर्मचाऱ्यांना चिरडण्याचा प्रयत्न होत असल्याने संताप व्यक्त केला जात आहे. दरम्यान वाळु माफियांना नेमके संरक्षण कोणाचे ? असा प्रश्न देखील या घटनेच्या पार्श्वभूमीवर उपस्थित होत आहे. या जीवघेण्या हल्ल्यानंतर महसूल विभागातील कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र संतापाचे वातावरण असून आरोपीवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. या प्रकरणी शिऊर पोलिसांनी शिवनाथ विश्वनाथ लंबे याच्याविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
महसुल अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर !!
तालुक्यात मागील काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात शिवना नदी पात्रातून अवैध वाळु वाहतूक सुरू आहे. ही वाहतूक बऱ्याचदा रात्री होत असते. या पार्श्वभूमीवर अवैध वाळु वाहतूक रोखण्यासाठी महसुल प्रशासनाकडून बऱ्याच वेळी पोलिस संरक्षणाशिवाय नदी पात्रात अथवा इतर ठिकाणी कारवाई केल्या जाते. सोबत पोलिस नसल्याने लाखणी येथे झालेल्या घटने सारखे प्रकार घडत असतात. या विषयी दुसरी बाजू अशी की पोलिस प्रशासनाचे कर्मचारी सोबत घेतले तर मग वाळु माफियांना लगेच 'लोकेशन' मिळून जाते. मग कारवाईच्या पार्श्वभूमीवर सर्व वाहन पसार होऊन जातात अशी माहिती महसुलच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांने नाव न सांगण्याच्या अटीवर दिली. हे जरी सर्व खरे असले तरी अवैध वाळु वाहतुकीला लगाम लावण्यासाठी गेलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा जीव देखील तितकाच महत्वाचा आहे. या साठी वरिष्ठ पातळीवर खासगी सुरक्षा रक्षक देण्याबाबत विचार होणे गरजेचे होऊन बसले आहे.



Social Plugin