वैजापूर

सततचे धरणे, आंदोलनामुळे वैजापूर पंचायत समितीचे सर्वत्र नाव खराब होत आहे. या मुळे येणाऱ्या काळात जनतेच्या कामांचा  गाव पातळीवरच निपटारा करा व आंदोलन या प्रकाराला कायमस्वरूपी आळा टाकून पंचायत समितीत 'चाफलेगिरी' करण्यासाठी येणाऱ्या लोकांना कर्मचाऱ्यांनी 'इंटरटेन' करू नये अशा सूचना जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी येथील पंचायत समिती सभागृहात पार पडलेल्या आढावा बैठकीत अधिकारी व कर्मचाऱ्यांना २५ मे रोजी केल्या. बैठकीला जिल्हा परिषद सदस्य संजय निकम, दीपक राजपूत, पंचायत समितीच्या सभापती वंदना शिंदे, गटनेते राहुल लांडे, हुसेन शेख, देवीदास सामसे, परिघाबाई पवार, गटविकास अधिकारी सुहास वाकचौरे आदींची उपस्थिती होती. 

दरम्यान वैजापूर पंचायत समिती कार्यालयात मागील काही दिवसांपासून मोर्चे, उपोषण, कार्यालयात गाढव सोडणे यासह इतर आंदोलन होत आहेत. कुणी पैशासाठी, कुणी प्रसिद्धीसाठी तर कुणी एखाद्याच्या बदनामीसाठी ही  आंदोलन अथवा तक्रारी करतात. या आंदोलनांत ५ टक्के जनता ही पीडित असते तर ९५ टक्के आंदोलक हे 'उगत' घेण्याचे प्रकार करतात. त्यामुळे या सर्व प्रकारांना कायमस्वरूपी आळा घालण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवे असे या बैठकीत जि. प.अध्यक्ष अविनाश गलांडे यांनी बोलताना सांगितले. या आंदोलनावर रामबाण उपाय म्हणून पंचायत समिती स्तरावर ठराव घेण्यात आला असून  यापुढील काळात आंदोलन करण्यासाठी तहसिल प्रशासनाची परवानगी अपरिहार्य असणार आहे. या परवानगी शिवाय कोणत्याही आंदोलनाला परवानगी मिळणार नये असा निर्णय घेण्यात आला. या बैठकी दरम्यान गटनेते राहुल लांडे यांनी घरकुल, विहिरी व गायगोठयांची पूर्ण झालेल्या कामांसाठी कुशल निधी उपलब्ध करून देण्याची मागणी केली. 

ऐका कर्मचाऱ्यांचेही गाऱ्हाणे !!

मागील काही दिवसांपासून पंचायत समिती समोर सुरू असलेले आंदोलनातील आंदोलक हे कोणत्याही विशिष्ट कामा ऐवजी मागील पाच वर्षात झालेल्या पंचायत समिती कार्यालयातंर्गत १७ हजार कामांची चौकशी करण्याची मागणी करून पाच सदस्यीय समिती गठीत करून आम्हाला त्या समितीत घ्या अशी मागणी करत आहे. या मागणीबाबत विचार केल्यास कायदेशीर किचकट बाबींची पूर्तता होऊ शकत नाही. याशिवाय काही लोक गळ्यात आय कार्ड घालून कुठल्याही पुराव्याविना कार्यालयात येऊन धुडगूस घालतात त्या मुळे प्रशासकीय कामे करताना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते, असे गाऱ्हाणे पंचायत समिती अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या बैठकीत मांडली. या वर लोकांची कामे गाव पातळीवर पूर्ण करा.अशा सूचना करत पंचायत समितीत 'चाफलेगिरी' करण्यासाठी येणाऱ्या लोकांना कर्मचाऱ्यांनी 'इंटरटेन' करू नये अशा सूचना जिल्हा परिषदचे अध्यक्ष गलांडे यांनी या वेळी केल्या.