वैजापूर

शहरापासून थोड्याच अंतरावर बेलगाव रस्त्यालगत सुरू असलेल्या एका कत्तलखान्यावर वैजापूर पोलिसांनी छापा टाकून कत्तलीसाठी डांबून ठेवलेल्या २२ गोवंश जातीच्या जनावरांची सुटका केली. ०४ एप्रिल रोजी रात्रीच्या सुमारास पथकाने ही कारवाई केली. या प्रकरणी असलम कुरेशी (रा. वैजापूर) याच्यासह तिघा अज्ञाताविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर शहरालगत असलेल्या बेलगाव रोडवरील एका पत्र्याच्या शेडमध्ये कत्तलीच्या उद्देशाने मोठ्या प्रमाणावर गोवंश जातीची जनावरे डांबून ठेवली असल्याची माहिती पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली.  या माहितीच्या आधारे पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्यासह पथकाने शनिवारी रात्री दहा वाजेच्या सुमारास माहितीतील ठिकाणावर छापा टाकला. या छाप्यात कत्तलीसाठी आणलेली २२ गोवंश जातीची जनावरे पथकाला मिळून आली असून ती अत्यंत दाटीवाटीने आणि क्रूरपणे डांबून ठेवलेल्या अवस्थेत आढळून आली. दरम्यान त्याठिकाणी जमिनीवर मोठ्या प्रमाणात रक्त सांडलेले आढळून आले. शिवाय काही ड्रममध्ये जनावरांची शिंगे व चामडी साठवून ठेवल्याचेही मिळून आले. यावेळी पथकाने २२ गोवंश जातीच्या जनावरांची सुटका करून ती गोशाळेत हलविण्यात आली. याप्रकरणी पोउपनिरीक्षक युवराज पाडळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून असलम कुरेशी व इतर अज्ञाताविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलीस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्यासह उपनिरीक्षक एकनाथ नागरगोजे, युवराज पाडळे, पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश झाल्टे, किसन गवळी, अविनाश भास्कर, गणेश काळे, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत गीते, प्रल्हाद जटाळे, अमोल कांबळे, नवनाथ केरे, अजित नाचन, गणेश कुलट आणि रणजीत चव्हाण यांच्या पथकाने केली.