वैजापूर

आगामी निवडणुकांपूर्वी सुरू असलेल्या मतदान पुनरिक्षण सर्वेक्षणातून वैजापूर विधानसभा मतदारसंघात धक्कादायक बाब समोर आली आहे. मतदार यादीतील गोंधळ आता उघड होत असून वैजापूर विधानसभा मतदारसंघात तब्बल १२,०७९ मतदारांची नावे दोन वेगवेगळ्या ठिकाणी नोंद झाल्याचे आढळले आहे. या उघडकीनंतर स्थानिक निवडणूक विभाग तातडीने कामाला लागले आहे. निवडणूक आयोगाकडून प्राप्त झालेल्या यादीमुळे अनेक वर्षे ही दुबार नोंद कशी राहिली? याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारण यामुळे बोगस मतदानाची शक्यता जास्त आहे. दरम्यान यातील १४४८ मतदारांनी स्वतः पुढे येऊन आपली नावे वगळली आहेत. 


या प्रकरणाची गंभीर दखल घेत प्रशासनाने डीएसई (डुप्लिकेट सिमिलर एन्ट्री) अंतर्गत दुबार नावे हटवण्याची प्रक्रिया वेगात सुरू केली आहे. केंद्रस्तरीय मतदान अधिकाऱ्यांना (बीएलओ)  घराघरांत जाऊन पडताळणी करण्याचे आदेश देण्यात आले असून संबंधित मतदारांशी संपर्क साधून त्यांचे नाव केवळ एका ठिकाणीच राहील याची खात्री केली जाणार आहे. याबाबत प्राप्त माहितीनुसार सतत होणारे स्थलांतर, विवाहानंतर नावातील बदल, मृत्यूनंतर नाव न वगळणे आणि डिजिटल अद्ययावत प्रक्रियेत झालेल्या त्रुटींमुळे अशा गोंधळाला खतपाणी मिळाले. याशिवाय मतदार यादीचे वेळोवेळी योग्य पडताळणी न होणे हेही मोठे कारण समोर आले आहे. काही गैरप्रवृत्तीचे नागरिक मतदानात स्वतःलाच मत मिळावे म्हणून एकाच व्यक्तीची नोंद वेगवेगळ्या भागांत करतात, अशीही शक्यता व्यक्त होत आहे. या मोहिमेचा सकारात्मक परिणाम दिसू लागला आहे. आतापर्यंत १,४४८ मतदारांनी स्वतःहून पुढे येत एका ठिकाणाहून आपले नाव वगळून घेतले असून ही जबाबदार पाऊल मानले जात आहे. डीएसई कारवाईसोबतच आता पीएसई (फोटो सिमिलर एन्ट्री) तपासही सुरू करण्यात आला आहे. म्हणजेच मतदार यादीत एकसारखे फोटो असलेल्या मतदारांची छाननी केली जात आहे.



कायदेशीर परिणाम काय?

निवडणूक नियमांनुसार एका व्यक्तीचे नाव एकापेक्षा अधिक ठिकाणी असणे बेकायदेशीर आहे. जाणीवपूर्वक असे केल्यास संबंधित व्यक्तीवर कारवाई होऊ शकते. अशा प्रकरणांत मतदाराचे नाव रद्द होण्याबरोबरच भविष्यातील मतदान अधिकारावरही परिणाम होऊ शकतो. आगामी निवडणुकांपूर्वी मतदार यादी पूर्णपणे शुद्ध व पारदर्शक करण्याचा प्रशासनाचा दावा असून प्रत्येक संशयित नोंदीची विशेष मोहिमेद्वारे तपासणी केली जाणार आहे.