वैजापूर
वैजापूरात नुकतीच तालुका व शहर काँग्रेस संघटनेची महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली. या बैठकीस पक्षाचे राष्ट्रीय सचिव विवेक बन्सल वरिष्ठ प्रवक्ता अतुल लोंढे, महराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस धनंजय चौधरी, जिल्हाध्यक्ष किरण पाटील डोणगावकर यांची प्रमुख उपस्थिती होती. दरम्यान विवेक बन्सल यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, काँग्रेस पक्षात काही बदल होत नाही अशी कार्यकर्ते व सर्वसामान्यांची तक्रार आहे. मात्र आता हे चित्र बदलत असून काँग्रेस पक्षात संघटन सृजन अभियान राबवले जात आहे. या अभियानांतर्गत वैजापूर तालुका व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात प्रत्येक पातळीवर विविध आघाड्यांच्या प्रमुखांची नेमणूक करण्यात येणार आहे.
काँग्रेस पक्षाचा इतिहास हा सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जोरावर देशाला स्वातंत्र्य मिळवून देणाऱ्या चळवळीशी जोडलेला आहे. त्यानंतरही देशाला प्रगतीपथावर नेण्याचे काम काँग्रेसने केले आहे. या अभियानाचा उद्देश काँग्रेसवर प्रेम करणाऱ्या सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहोचणे हा आहे. महात्मा गांधी यांच्या प्रेरणेने आणि राहुल गांधी यांच्या संकल्पनेनुसार काँग्रेस पक्षात अंतर्बाह्य परिवर्तन घडवून आणण्यासाठी देशभर हे अभियान राबवले जात आहे. मल्लिकार्जुन खर्गे यांच्या नेतृत्वाखाली संघटन अधिक मजबूत करण्याचे काम सुरू आहे. या अभियानांतर्गत जिल्हाध्यक्ष व तालुकाध्यक्षांची निवड ही कार्यकर्त्यांच्या मतांवर आधारित केली जाणार असून, निरीक्षक प्रत्येक तालुक्यात भेट देऊन माहिती संकलित करत आहेत. ही माहिती पुढे प्रदेश व राष्ट्रीय स्तरावर पाठवून त्यानुसार पदाधिकाऱ्यांची निवड केली जाणार आहे. यामध्ये विशेषतः तरुण नेतृत्वाला प्राधान्य देण्याबरोबरच ओबीसी, दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक व महिलांचे प्रतिनिधित्व वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. या बैठकीस राहुल संत, नितेश शहा, सुभाष गायकवाड, सुनील बोडके, प्रवीण जाधव, रोहित आहेर, सलीम भाई तांबोळी, राजू शेख, सुलतान पठाण, विकास सोमवंशी, बाबासाहेब गायकवाड, सुशील भाऊ आसर , मधुकर साळुंखे, सय्यद फैयाज, साहेबराव पडवळ, प्रवीण काजळ, प्रदीप जाधव, प्रतिभा जाधव आदी काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुशील असर यांनी केले. प्रास्ताविक राहुल संत यांनी मांडले तर आभार प्रदर्शन प्रवीण जाधव यांनी केले.



Social Plugin