पालिकेकडून विविध क्षेत्रांतील कर्तृत्वान महिलांचा सन्मान
वैजापूर
जागतिक महिला दिनानिमित्त वैजापूर नगर परिषद व महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने राष्ट्रीय आजीविका अभियानांतर्गत कर्तृत्ववान महिलांचा सन्मान सोहळा पार पाडत स्त्री शक्तीचा जागर करण्यात आला. १० मार्च रोजी विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या ६० महिलांचा गौरव सन्मान करण्यात आला.
नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, उपनगराध्यक्ष रियाज शेख, माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी व मुख्याधिकारी भागवत बिघोत यांच्या मार्गदर्शनाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शिक्षण, सामाजिक कार्य, पोलिस विभाग, विधी क्षेत्र, वैद्यकीय सेवा, गृहउद्योग, कचरा संकलन, स्वच्छता कर्मचारी, शासकीय सेवा, उद्योजकता तसेच महिला बचत गटांच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य करणाऱ्या एकूण ६० महिलांना प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी ‘एक पेड़ मां के नाम’ या अभियानांतर्गत अमृत २.० योजनेतून ४४०० वृक्षांची लागवड व संवर्धन करणाऱ्या महिलांचाही विशेष सन्मान करण्यात आला. या महिलांच्या कार्याचे उपस्थितांनी कौतुक केले. कार्यक्रमाचे आयोजन माजी नगराध्यक्षा शिल्पा परदेशी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले.कार्यक्रमास महिला व बालकल्याण सभापती संगीता राजुसिंग राजपूत यांच्यासह सुमैया शेग, मोनाली खैरे, पूजा त्रिभुवन, जयश्री चौधरी, दीपा राजपूत, लता वाणी, सुरेखा घाटे, ज्योती जोशी, सुवर्णा ठोबरे, जयश्री राजपूत, कविता शिंदे व मनीष गणवीर आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक प्रकल्प अधिकारी सुनील भाग्यवंत व समुदाय संघटक दिवाकर त्रिभुवन यांनी केले. यावेळी महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांचे प्रदर्शनही भरविण्यात आले होते. या प्रदर्शनाला उपस्थित महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.कार्यक्रमाची सुरुवात मौलाना आझाद विद्यालय व सेंट मोनिका इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या संगीत व नृत्य कार्यक्रमाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नागेश बापट यांनी केले. यावेळी वैजापूर शहरातील विविध क्षेत्रांतील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.


Social Plugin