वैजापूर
वैजापूर पंचायत समितीच्या सभापती व उपसभापतींची निवड १० मार्च रोजी पार पडली. दरम्यान सभापतीपदी शिवसेनेच्या वंदना शिंदे यांची तर उपसभापतीपदी सोनाली जाधव यांची बिनविरोध निवड पार पडली. निवडणूक निर्णयधिकारी तथा उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांच्या अध्यक्षतेखाली येथील पंचायत समिती सभागृहात ही निवडणूक प्रक्रिया पार पडली.
पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती पदाच्या निवडीचा कार्यक्रम जाहीर होताच वैजापूर तालुक्यात राजकीय हालचालींना वेग आला होता. पंचायत समितीच्या एकूण १६ सदस्यांपैकी शिवसेनेकडे सर्वाधिक संख्याबळ असल्याने सत्तास्थापनेत शिवसेनाच बाजी मारणार ही गणित जवळपास निश्चित मानल्या जात होते. दरम्यान येथील सभापतीपद हे अनुसूचित जातीच्या महिलेसाठी राखीव होते.पंचायत समिती निवडणुकीत शिवसेनेने १६ पैकी ७ जागा जिंकल्या. त्याशिवाय इतर पक्षांच्या तीन सदस्यांचा पाठिंबा मिळाल्याने सेनेचे एकूण संख्याबळ १० वर पोहोचले. या पार्श्वभूमीवर संवदगाव गणातून निवडून आलेल्या शिवसेनेच्या वंदना शिंदे यांची तर सोनाली जाधव यांची उपसभापतीपदी निवड करण्यात आली. सेनेचे आमदार रमेश बोरनारे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या निवडीबद्दल आ. बोरनारे यांच्यासह भाऊसाहेब चिकटगावकर, जिल्हा प्रमुख बाबासाहेब जगताप, जिल्हा परिषद सदस्य रामहरी जाधव, श्रीराम गायकवाड, माजी उपनगराध्यक्ष साबेरखान, संजय बोरनारे, नगरसेवक पारस घाटे, राजू छानवाळ आदींनी त्यांचे अभिनंदन केले.



Social Plugin