जागतिक राजकारणात मोदींचा 'मास्टरस्ट्रोक'....

 


इस्त्रायल दौरा,आखाती युद्धछाया आणि भारताची चाल !!


अमोल राजपुत

हा विषय तथा त्याचा आशय हा काही कुण्या राजकीय नेत्याचा अथवा पक्षाचा अजेंडा चालविणे किंवा प्रचार करणे नक्कीच नाही. परंतु भारताला छेडाल तर संपूर्ण जगात काय होऊ शकते !! याबाबत छोटेखानी खुलासा म्हणून 'लोकसत्ताक' च्या वाचकांचा अवलोकणार्थ केलेला लिखाण प्रपंच होय.


 २५ व २६ फेब्रुवारी रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे इस्रायलच्या दोन दिवसीय दौऱ्यावर गेले त्या दिवसापासून असा प्रश्न पडला की, अमेरिकेसोबतच्या ट्रेड डीलसारखा महत्त्वाचा निर्णय घेतला जात असताना मोदी हे अचानक इस्रायलला गेलेच कसे? दरम्यानच्या काळात याबाबत भरपूर अभ्यास व मंथन झाले. पंतप्रधान मोदी हे इस्त्राईलहुन परतताच २८ फेब्रुवारीला युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन युद्धास सुरुवात झाली. दरम्यान अमेरिकेसोबतच्या ट्रेड डीलमुळे भविष्यात भारताला तेल आयातबाबत काही कठोर निर्णय घ्यावे लागणार होते. अन्यथा भारताला प्रचंड टॅरिफचा सामना करावा लागला असता. तो टॅरिफ ५० टक्क्यांपर्यंत गेला होता आणि भविष्यात २०० टक्क्यांपर्यंत वाढवण्याच्या अमेरिकेकडून धमक्या दिल्या जात होत्या. भारत - अमेरिका ट्रेड डील व त्यातील अटींमुळे खिन्न मनाने का होईना भारताला मित्रदेश रशियासोबतचे संबंध बदलण्याची वेळ आली होती. थोडक्यात सांगायचे झाल्यास 'अमेरिकेसोबत झालेली ट्रेड डील ज्या अनुसार अमेरिका भारतावर जास्त टेरिफ लादणार नाही आणि मग  बदल्यात भारताला  अमेरिकेकडून तेल खरेदी सक्तीची!!'

कारण अमेरिकेसोबत व्यापार करार करूनही जर आपण रशियाकडून तेल घेत राहिलो तर अमेरिकेची मोठी नाराजी झेलावी लागली असती.  याच काळात मोदींनी 'साप भी मरे और लाठी भी न टूटे' या उक्तीचा वापर करत इस्राईलला भेट दिली. या भेटी दरम्यान त्यांनी काय जादू वापरली हे माहित नाही. परंतु ते मायदेशी परतताच काही दिवसांतच (२८ फेब्रुवारी पासून) आखाती देशात युद्धाची परिस्थिती निर्माण झाली. अमेरिका-इस्रायल युद्धामुळे इराणने हार्मुझ सामुद्रधुनी (जगाच्या २० टक्के भागात इंधन तेल याच मार्गाने वाहतूक केले जाते) बंद केली. त्यामुळे जगातील बहुतांश देश तेल संकटाच्या उंबरठ्यावर आले. दुसरीकडे रशियाचे तेल टँकर समुद्रात अडकून पडले. भारत व अमेरिका यांच्यातील ट्रेड डीलमुळे कालपर्यंत 'भारताला रशियन तेल खरेदी करता येणार नाही' असे सांगणाऱ्या अमेरिकेला आता स्वतः मोदींना "३० दिवसांकरता रशियन तेल खरेदी करा” अशी सहमती देण्यास भाग पडले. मग म्हणता काय तर थोडीशी (खोटी-खोटी) नाराजी असल्याचे दाखवत मोदींनी ब्लादीमार पुतिनकडे पाहून ट्रम्पची मागणी मान्य केली.  माना अथवा नका मानू परंतु हे युद्ध सुरू होण्याच्या मागे कुठेतरी अमेरिकेचे राष्ट्रध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची  वैश्विक दादागिरी, देशांवर अगडबंब टेरिफ लादणे, सक्तीची तेल खरेदी या व इतर तत्सम बाबी कारणीभूत ठरल्याचे प्रथमदर्शनी केलेल्या अभ्यासात बौद्धिक जाणीव होते. बाकी काहीही असो  'ट्रम्प यांचा ड्रम वाजविण्याच्या' 'सुमडीत' घडलेल्या प्रकाराला देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचा मास्टरस्ट्रोकच म्हणावा लागेल....