मुरारी पार्क परिसरात दुकान आगीच्या भक्षस्थानी....

 


वैजापूर

शहरातील मुरारी पार्क परिसरात असलेल्या एका ऑटोमोबाईल दुकानाला शुक्रवारी (६ मार्च) अचानक भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीने काही वेळातच रौद्ररूप धारण केल्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. दुकानातून धुराचे लोट बाहेर येत असल्याचे नागरिकांच्या निदर्शनास येताच त्यांनी तातडीने वैजापूर नगर पालिकेच्या अग्निशमन विभागाला या घटनेची माहिती दिली.

घटनेची गांभीर्य ओळखून नगर पालिकेचे अग्निशमन वाहन तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी अथक परिश्रमानंतर आगीवर नियंत्रण मिळवले, ज्यामुळे शेजारील इतर दुकानांना लागणारा धोका टळला.मात्र, या आगीची तीव्रता इतकी मोठी होती की, दुकानातील ऑटोमोबाईलचे संपूर्ण सुटे भाग आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे. यामुळे दुकानदाराचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून प्राथमिक अंदाजानुसार लाखो रुपयांचे साहित्य आगीच्या भक्षस्थानी पडले आहे. आगीचे नेमके कारण अद्याप समजू शकले नसले तरी, शॉर्ट सर्किटमुळे ही आग लागली असावी असा संशय व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच शहरातील आमदार रमेश बोरनारे यांच्यासह नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, नगरसेवक प्रशांत कंगले आणि माजी पंचायत समिती सभापती बाबासाहेब जगताप यांनी घटनास्थळाची पाहणी करून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामा करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या.