वैजापूर
भाडेतत्वावर दिलेल्या वाहनाचे बिल काढण्यासाठी चक्क फोन-पेवर लाच स्वीकारणारा उपविभागीय जलसंधारण अधिकारी छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाच्या गळाला लागला. ७ मार्च रोजी पथकाने वैजापूर शहरातील शिऊर रोड लगत असलेल्या अयोध्या नगर परिसरात ही कारवाई केली. निखिल अशोक कवाडे ( उपविभागीय जलसंधारण अधिकारी ,वैजापूर जलसंधारण विभाग जिल्हा परिषद कार्यालय, छत्रपती संभाजीनगर - वर्ग-१) असे लाचखोर अधिकाऱ्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेतील तक्रारदार यांचा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचा व्यवसाय आहे. त्यांनी जिल्हा परिषद जलसंधारण विभागात कार्यरत असलेले निखिल कवाडे यांना बोलेरो वाहन मासिक भाडेतत्त्वावर किरायाने दिले होते. दरम्यान सदरील वाहनाचे थकीत देयक काढण्यासाठी कवाडे यांनी संबंधित वाहन पुरवठाधारकाकडे लाचेची मागणी केली. मात्र घटनेतील तक्रारदाराची लाच देण्याची इच्छा नसल्याने त्यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. दरम्यान कवाडे यांनी १० हजार रुपये लाचेची मागणी केली. शनिवारी दुपारी तक्रारदाराने तडजोडी अंती ७ हजार रुपये इतकी लाचेची रक्कम निखिल कवाडे यांना फोन-पे द्वारे दिली. सदरील घटनाक्रम छत्रपती संभाजीनगर येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून पंचासमक्ष टिपला.


Social Plugin