वैजापूर

डायल - ११२ या क्रमांकावर कॉल करून पोलिसांना विनाकारण कामाला लावणाऱ्या एकाविरुद्ध २२ मार्च रोजी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. किशोर मोगल जगताप (वैजापूर) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्याचे नाव आहे.

या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर जगताप हा शहरातील स्वामी समर्थनगर परिसरात रहिवासास आहे. दरम्यान रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्याने त्याच्या मोबाईलहुन डायल - ११२ या क्रमांकावर कॉल करून 'बोरसर (कारखाना) येथे दारू व पेट्रोलची विक्री सुरू आहे' अशी माहिती दिली. मात्र तपसाअंती सदरील माहिती खोटी असल्याची पोलिसांना खात्री पटली. दरम्यान कुठलीही अत्यावश्यक परिस्थिती उदभवलेली नसताना पोलिसांना विनाकारण कामाला लावल्याप्रकरणी किशोर जगताप याच्याविरुद्ध पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा अधिक तपास पोलिस हवालदार विशाल पडळकर हे करीत आहे.