वैजापूर 

वैजापूर पंचायत समितीच्या नव्याने निवडून आलेल्या सदस्यांची पहिलीच विशेष सभा कार्यालयात सुरू असलेल्या भ्रष्टाचाराच्या मुद्द्यांवर चांगलीच वादळी ठरली. विकासकामांच्या आढाव्यासाठी बोलावलेल्या या बैठकीत भ्रष्टाचार, मनमानी आणि प्रशासकीय दुर्लक्ष यांचे गंभीर आरोप झाल्याने वातावरण चांगलेच तापले होते.

या सभेत पंचायत समिती सदस्य तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित पवार गट)चे गटनेते राहुल लांडे यांनी उघडपणे आरोप करत प्रशासक काळात नियम डावलून मनमानी निर्णय घेण्यात आले आणि उघडपणे भ्रष्टाचार झाला. दरम्यान मागील अधिवेशनात मंजूर झालेल्या विहिरींच्या मंजुरीसाठी अनेक शेतकऱ्यांकडून ३०-३० हजार रुपयांपर्यंत अवैध वसुली करण्यात आली. मात्र आता त्या मंजुऱ्या अचानक रद्द करण्यात आल्याने शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका सहन करावा लागत असून, त्यांना पुन्हा अर्ज करण्यासाठी कार्यालयांचे चकरा माराव्या लागत आहेत. सुमारे तीन तास चाललेल्या या बैठकीत प्रशासनाने नव्या सदस्यांचा परिचय करत आरोग्य, पशुसंवर्धन, मनरेगा (एमआरजीएस), घरकुल यांसारख्या विविध योजनांचा आढावा सादर केला. मात्र आढावा सुरू असतानाच सदस्यांचा रोष उफाळून आला. घरकुल योजनेत अभियंते वेळेवर घरांच्या बांधकामाचे फोटो घेत नसल्याने लाभार्थ्यांचे अनुदान  रखडले जाते याशिवाय  छायाचित्रे (फोटो) अपलोड करण्याच्या नावाखाली लाभार्थ्यांकडून पैशांची मागणी करण्यात येते, मनरेगा (एमआरजीएस) योजनेत मंजुरीपासून ते देयकापर्यंत प्रत्येक टप्प्यावर ‘कट’ संस्कृती वाढत असून योजनांची माहिती गावपातळीवर पारदर्शकपणे पोहोचत नसल्याने दलालांमुळे शेतकरी योजनांपासून वंचित राहत असल्याचे आरोप करत उपस्थित सदस्यांकडून तक्रारींचा पाढाच या बैठकीत सदस्यांकडून वाचण्यात आला. या पार्श्वभूमीवर आगामी काळात पंचायत समिती कार्यालयातील कारभार पारदर्शक न झाल्यास लोकप्रतिनिधी पंचायत समिती प्रशासनास नक्कीच धारेवर धरणार हे मात्र नक्की..