वैजापूर
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष कल्याण पाटील दांगोडे यांची सोमवारी बिनविरोध निवड करण्यात आली. यापूर्वीचे सभापती व शिवसेनेचे संचालक रामहरी जाधव यांच्यावर भाजप, राष्ट्रवादी काँग्रेसच्या १३ संचालकांनी अविश्वास ठराव दाखल करून त्यांना पदावरून पायउतार केल्यानंतर झालेली ही निवड राजकीय दृष्ट्या महत्वाची मानली जात असून तीन वर्षानंतर बाजार समितीची सत्ता भाजप शिवसेना युतीकडून भाजप व राष्ट्रवादी काँग्रेस या मित्र पक्षांकडे गेली आहे.
पिठासीन अधिकारी किरण चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी अकरा वाजता झालेल्या या विशेष सभेत सभापती पदासाठी केवळ कल्याण दांगोडे यांचाच एकमेव अर्ज शिल्लक राहिल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर करण्यात आले. या सभेला उपसभापती शिवकन्या पवार, काकासाहेब पाटील, अविनाश गलांडे, प्रशांत सदाफळ, रजनीकांत नजन, प्रशांत त्रिभुवन, विजय ठोंबरे, शेख रियाज शेख अकिल, बाबासाहेब गायकवाड यांच्यासह देविदास वाणी, गणेश इंगळे, डॉ नंदकिशोर जाधव, सारंगधर डिके, मधुकर पवार आदींची उपस्थिती होती.
वरिष्ठांकडून निवडीचे स्वागत..
कल्याण दांगोडे यांची बिनविरोध निवड जाहीर झाल्यानंतर बाजार समितीच्या सभागृहात भाजपचे नेते व नगराध्यक्ष डॉ दिनेश परदेशीं, राष्ट्रवादी काँग्रेसचे जेष्ठ नेते हाजी अकिल शेख, खरेदी विक्री संघांचे सभापती साहेबराव औताडे, भाजपचे सरचिटणीस दशरथ बनकर, कैलास पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत दांगोडे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी दांगोडे यांनी डॉ दिनेश परदेशी यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या निवड प्रक्रियेतून भाजपने आपल्याला न्याय दिला असल्याची प्रतिक्रिया व्यक्त करत सर्वाना सोबत घेऊन आगामी काळात शेतकरी हितासाठी योग्य निर्णय घेऊ तसेच पायाभूत सुविधा देण्यावर अधिक भर देणार असल्याचे सांगितले. डॉ परदेशीं यांनी सर्व संचालकांचे आभार मानत ही बाजार समिती अधिक समृद्ध करण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन दिले. जिल्हा परिषद सदस्य अविनाश गलांडे यांनीही मनोगत व्यक्त केले.



Social Plugin