वैजापूर पोलिस ठाण्यात विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन कार्यक्रम...

 

वैजापूर

शहरातील विद्याधन इंग्लिश स्कूल शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी ०४ मार्च रोजी वैजापूर पोलिस ठाण्यात मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी शाळेच्या व्यवस्थापनाच्यावतीने वैजापूर पोलिसांचा सत्कारही करण्यात आला.  


विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले.

या कार्यक्रमा दरम्यान पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना  मार्गदर्शन करताना विद्यार्थी दशेतील शालेय शिस्त, कायद्याचे ज्ञान, सायबर गुन्ह्यांपासून सावधगिरी, करिअर निवड, वाहतुकीचे नियम, स्पर्धा परीक्षांची तयारी याबाबत सविस्तर माहिती दिली. मोबाईल व सोशल मीडियाचा योग्य वापर करण्याचे महत्त्व देखील त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना पटवून सांगितले. तसेच विद्यार्थ्यांनी चुकीच्या संगतीपासून दूर राहून आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान पोलिस निरीक्षक ताईतवाले यांना विद्यार्थ्यांनी विविध प्रश्न विचारून शंका निरसन करून घेतले. याशिवाय विद्यार्थ्यांना पोलिस ठाण्यातील दैनंदिन  कामकाजाची माहिती देखील देण्यात आली. कार्यक्रमास संस्थेच्या अध्यक्षा आशा गायके, सचिव दिगंबर गायके, शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांसह विद्यार्थी, पोलिस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरला.