पत्रकारपरिषदेत निकम यांचा खळबळजनक गौप्यस्फोट...

वैजापूर

नुकत्याच पार पडलेल्या छञपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांच्या निवडी दरम्यान झालेल्या घोडेबाजारावर येथील शिवेसेनेचे (उबाठा) जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी पत्रकार परिषद घेत मोठा गौप्यस्फोट केला. जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी पक्षाच्या ९ सदस्यांच्या नावावर केलेली १८ कोटींची 'डील' आपणच उधळून लावल्याचा खळबळजनक दावाही त्यांनी या पत्रकार परिषदेत  केला. 

छञपती संभाजीनगर जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष निवडी दरम्यान शिवसेनेचे (उबाठा) जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांनी पक्षाचे जिल्हा परिषद सदस्य संजय निकम व ललिता सोनवणे हे 'भाजपच्या नादी' लागल्याचा आरोप केला होता. मात्र १९ मार्च रोजी पत्रकार परिषद घेऊन जिल्हा परिषद सदस्य संजय निकम यांनी या आरोपाचे खंडन करत उलट अंबादास दानवे यांनीच आमच्या नावावर 'शिंदे सेने' बरोबर तब्बल १८ कोटी रुपयांचा 'सौदा' केल्याचा खळबळजनक दावा  केला आहे. याशिवाय या 'सौद्या' दरम्यान जिल्हा प्रमुखांनी ४ कोटींचे 'टोकन' घेतले होते तर उर्वरित १४ कोटी रुपये हे त्यांना मतदानानंतर  मिळणार होते. या सर्व घोडेबाजारा दरम्यान शिवेसेनेच्या ९ जिल्हा परिषद सदस्यांना १० ते १७ मार्च दरम्यान इगतपुरी, मुंबई, गोवा व इतर ठिकाणी आम्हाला सहलीच्या नावाखाली 'नजरकैदीत' ठेऊन फिरविण्यात आले. यावेळी जिल्हा प्रमुखांचे बंधु व काही सुरक्षा रक्षक देखील आमच्याबरोबर होते. मात्र या सर्व घटनाक्रमा दरम्यान आमच्यातील कुणीही सदस्य 'ब्र' काढायच्या मानसिकतेत नव्हता. शिवाय या 'कथित' सहली दरम्यान आमचे मोबाईल  देखील 'जप्त' करण्यात आले. मात्र गोव्यात असताना मॉर्निंग वॉकच्या बहाण्याने मी व ललिता सोनवणे त्यांच्या तावडीतून निसटलो. यानंतर अखेर मीच पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी संपर्क करून सुरू असलेला प्रकार व जिल्हा प्रमुखांचे 'कारस्थाना' बाबत त्यांना माहिती दिली. याशिवाय या प्रकाराबद्दल पक्षाच्या ९ पैकी ८ जिल्हा परिषद सदस्यांचा देखील विरोध असल्याचे  आपण पक्ष प्रमुखांना कळविले. या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनीही आम्हाला मतदान प्रक्रियेपासून तटस्थ राहण्याचे आदेश दिले असा खुलासा निकम यांनी यावेळी केला. याशिवाय जिल्हा प्रमुख अंबादास दानवे यांच्या नेहमीच्या 'कार्यपद्धती' वर देखील निकम यांनी सडकून टीका केली. दरम्यान आम्ही भाजपसोबत कुठलाही आर्थिक व्यवहार केला नसून फक्त आपले अपयश झाकण्यासाठी दानवे हे आमच्यावर बिनबुडाचे आरोप करत आहेत असे सांगत यापुढील काळात देखील आपण शिवेसेना (उबाठा) पक्षासोबतच असून विधानसभा मतदारसंघात जनहिताची कामे सुरूच ठेवणार असल्याचे सांगितले. याशिवाय भविष्यात पक्षासाठी विधानसभेचा उमेदवार देण्याची जबाबदारीही आपल्यावर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.


'माझेही जनतेत अस्तित्व...'

जिल्हा परिषद निवडणुकी दरम्यान आपल्याला शिवसेना (उबाठा) पक्षाच्या उमेदवारीसह इतरांनीही नक्कीच सहकार्य केले या बद्दल दुमत नाही.  तरी देखील माझाही जनसंपर्क व मी माझ्या गटातील लोकांच्या हितांची केलेल्या कामांमुळेच जनतेत माझेही अस्तित्व असल्यानेच आपण निवडून आल्याची स्पष्टोक्ती जि.प. सदस्य संजय निकम यांनी यावेळी दिली.