धनादेश अनादरण प्रकरणी सहा महिने कारावास ; एक लाख रुपये दंड...



वैजापूर

उधार घेतलेल्या मालाच्या रकमेच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश अनादरीत झाल्याप्रकरणी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के.खान (मॅडम) यांनी एकास ६ महीने कारावास व १ लाख वीस हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. मुकुंद दत्तात्रय कुलकर्णी (रा. शिऊर ता. वैजापूर) असे शिक्षा सूनविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकरणातील फिर्यादी चंद्रशेखर खांडगौर यांचे तालुक्यातील शिऊर येथे  कृषी सेवा केंद्र आहे. दरम्यान प्रकरणातील आरोपी मुकुंद कुलकर्णी याने सन-२०१८ मध्ये त्यांच्या दुकानातून ८० हजार रुपयांचा माल उधार घेतला. परंतु पिक निघाल्यानंतर देखील कुलकर्णीने उधार नेलेल्या मालाचे पैसे जमा केले नाहीत. त्यामुळे दुकानदार खांडगौर यांनी सदर रकमेची वारंवार मागणी केली. यामुळे आरोपीने त्यांना बँक ऑफ महाराष्ट्रचा (शाखा - शिऊर) ०८ फेब्रुवारी २०२१ या तारखेचा ८० हजार रुपयांचा धनादेश दिला. मात्र हा धनादेश अनादरीत होऊन परत आला. त्यानंतर फिर्यादिने ॲड. एस. एस. ठोळे यांचेमार्फत आरोपीस नोटीस पाठवून अनादरीत झालेल्या धनादेशाची रक्कम जमा करण्यास सांगितले होते. परंतु आरोपीने मुदतीत रक्कम जमा न करता नोटीसचे खोटे व चुकीचे उत्तर पाठविले. त्यामुळे फिर्यादीने आरोपीविरुद्ध वैजापूर येथील न्यायालयात ॲड. एस. एस. ठोळे यांचेमार्फत चलनक्षम दस्तऐवज कायद्याचे कलम १३८ नुसार फिर्याद दाखल केली होती. प्रकरणात फिर्यादीतर्फे एक व आरोपीतर्फे दोन साक्षीदार तपासण्यात आले. न्यायालयाने उपरोक्त प्रकरणातील फिर्याद, सबळ साक्षीपुरावा व मुद्देसूद युक्तिवाद लक्षात घेता आरोपी मुकुंद कुलकर्णी यास सहा महिने कारावास, १ लाख २० हजार रुपये दंड फिर्यादिस एका महिन्यात देण्याचे तसेच यात कसूर केल्यास अतिरिक्त ३ महिने कारावासाची शिक्षा सुनावली. प्रकरणात फिर्यादीतर्फे ॲड. एस. एस. ठोळे व ॲड. आकाश ठोळे यांनी काम पाहिले.