गंगापूर
स्टॅम्प विक्री दरम्यान पाचशे रुपये लाच स्वीकारणाऱ्या गंगापूर येथील एका शासनमान्य स्टॅम्प विक्रेत्याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (एसीबी) पथकाने (युनिट - जालना) रंगेहात पकडल्याची कारवाई १६ मार्च रोजी दुपारच्या सुमारास केली. श्रीकांत मोहनराव बनसोड ( व्यवसाय : शासन मान्य स्टॅम्प विक्रेता, रा. वर्धमान रेसिडेन्सी गंगापूर जि. छत्रपती संभाजीनगर) असे या स्टॅम्प विक्रेत्याचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, घटनेतील तक्रारदार यांना शैक्षणिक कामासाठी स्टॅम्प पेपरची आवश्यकता असल्याने त्यांनी १३ मार्च रोजी गंगापूर येथील शासनमान्य स्टॅम्प विक्रेते श्रीकांत बनसोड यांच्याकडून ५०० रुपये दराचा एक व १०० रुपये दराचे दोन असे तीन स्टॅम्प ७७० रुपयांत खरेदी केले. यानंतर १६ मार्च रोजी देखील तक्रारदार हे श्रीकांत बनसोड यांच्याकडे ५०० रुपयांचे स्टॅम्प खरेदी करण्यासाठी गेले. यावेळी बनसोड यांनी '५०० रुपयांचे दहा स्टॅम्प खरेदीसाठी पाच हजार ५०० रुपये लागतील' असे सांगितले. खरेदी दरम्यान ते ५०० रुपये लाचेची मागणी करत असल्याचे तक्रारदार यांच्या निदर्शनास आले. मात्र लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदार यांनी जालना येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे याबाबत तक्रार केली. त्यांनी दिलेल्या तक्रारीनंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सोमवारी दुपारी सापळा रचून स्टॅम्प विक्रेता श्रीकांत बनसोड यांना लाचेच्या रकमेसह रंगेहात पकडले. सदरची कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे (युनिट - जालना) पोलिस निरीक्षक शरदचंद्र रोडगे यांच्यासह पथकाने केली.

Social Plugin