वैजापूर
अमेरिका - इस्त्राईल व इराण युद्धजन्य परिस्थितीमुळे सर्वत्रच पडसाद उमटू लागले. याचा परिणाम थेट दैनंदिन व अत्यावश्यक गरजांवर होऊ लागला आहे. देशात गॅसटंचाईचा भडका उडालेला असतानाच ग्रामीण भागातही गॅस सिलिंडरसाठी गर्दी होताना दिसत आहे. व्यावसायिक सिलिंडर वितरण बंद असले तरी घरगुती सिलिंडरची मात्र सध्या कोणतीही कमतरता नाही. परंतु असे असले तरी सिलिंडर नोंदणीसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याची ओरड सुरू झाली आहे.
वैजापूर शहरासह तालुक्यात हिंदूस्थान पेट्रोलियमसह भारत पेट्रोलियम, इन्डेन, रिलायन्स व इंडियन पेट्रोलियमच्या गॅस एजन्सी आहेत. अमेरिका - इस्त्राईल व इराण युद्धाचा परिणाम सामान्यांच्या दैनंदिन जीवनातील गरजांवर होत आहे. विशेषतः सिलिंडर टंचाईच्या चर्चेमध्ये नागरिक सजग होऊन सिलिंडर नोंदणीसाठी गॅस एजन्सीवर ग्राहकांची गर्दी सुरू झाली आहे. हिंदूस्थान पेट्रोलियम सिलिंडर वापर करणाऱ्या ग्राहकांची शहरासह तालुक्यात एकूण संख्या ४५ हजार २०० आहे. वैजापूर गॅस एजन्सी मार्फत सिलिंडर वितरण केल्या जाते. याशिवाय अन्य गॅस एजन्सी अंतर्गत येणारी ग्राहक संख्या वेगळी आहे. सिलिंडर टंचाईच्या चर्चेमुळे गॅस विक्रेत्याकडे नोंदणी करणाऱ्या ग्राहकांची वाढत चालली आहे. वैजापूर गॅस एजन्सीकडे गेल्या आठ दिवसांत ३२०० ग्राहकांनी नोंदणी केली आहे. सध्या हे ग्राहक सिलिंडर प्रतीक्षेत आहेत. सिलिंडर टंचाई नाही अशातला भाग नाही. पुरवठा सुरळीत सुरू नाही. हेही तितकेच खरे आहे. परंतु नोंदणी व मागणीनुसार पुरवठा सुरू नाही. ही बाबही सुर्यप्रकाशाइतकी सत्य आहे. परंतु याही परिस्थितीत दररोज ८०० ते ९०० ग्राहकांना सिलिंडर वितरण सुरू आहे. पूर्वी २५ दिवसांच्या आत ज्या - ज्या वेळी सिलिंडरसाठी नोंदणी केली जायची, तेव्हा नोंदणी व्हायची. परंतु खरी अडचण हीच होत आहे. नोंदणी होत नसल्याने ग्राहकांनी धसका घेतला आहे. परंतु एजन्सीच्या नियमानुसार कोणताही ग्राहक २५ दिवसांच्या आत सिलिंडरसाठी नोंदणी करू शकत नाही. जास्तीच्या नोंदणीमुळे यंत्रणेवरील ताण वाढला आहे. घरगुती सिलिंडरची टंचाई नसली तरी व्यावसायिक सिलिंडर वितरण मात्र ४ मार्चपासून पूर्णपणे बंद झाले आहे.हिंदूस्थान पेट्रोलियम सिलिंडर वापरणाऱ्या व्यावसायिक ग्राहकांची एकूण संख्या ५५० आहे. व्यावसायिक सिलिंडर वितरण बंद असल्यामुळे याचा थेट परिणाम व्यवसायावर झाला आहे. विशेषतः हाॅटेल व्यावसायिक मोठे अडचणीत सापडले आहेत. दरम्यान युद्धजन्य परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या दरांमध्ये चढ-उतार सुरू झाले असून त्याचे परिणाम इंधन व गॅस पुरवठ्यावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये अनिश्चिततेचे वातावरण निर्माण झाले आहे. विशेषतः ग्रामीण भागात अफवांमुळे नागरिकांनी आधीच सिलिंडरची नोंदणी करण्यासाठी गर्दी केली आहे. अनेक ठिकाणी एजन्सी कार्यालयाबाहेर ग्राहकांच्या रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मात्र प्रशासन व गॅस वितरकांकडून नागरिकांना संयम बाळगण्याचे आवाहन करण्यात येत आहे.
अनावश्यक मागणी टाळा !
दरम्यान, गॅस एजन्सीकडूनही पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे. नोंदणी प्रणालीवर वाढलेला ताण कमी करण्यासाठी ग्राहकांनी अनावश्यक नोंदणी टाळावी, तसेच नियमानुसारच सिलिंडरची मागणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीकडेच लक्ष देण्याची गरज व्यक्त होत असून परिस्थिती नियंत्रणात असल्याचेही गॅस वितरकांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
व्यावसायिक सिलिंडर वितरण बंद असले तरी घरगुती सिलिंडरचे वितरण सुरू आहे. सध्या घरगुती सिलिंडरची कोणतीही कमतरता नाही. हे सिलिंडर मुबलक प्रमाणात उपलब्ध असून घाबरण्याचे कारण नाही.
यश खांबेकर, संचालक, वैजापूर गॅस एजन्सी




Social Plugin