ज्यूस पिणे व्यापाऱ्याला पडले महागात !! चार लाख ९० हजारांची रोकड लंपास...


वैजापूर 
तालुक्यातील शिऊर (बं.) येथे रस्त्याच्या कडेला कार उभी करून ज्यूस पिण्यासाठी जाणे एका व्यापाऱ्याला चांगलेच महागात पडले. अज्ञात चोरट्याने व्यापाऱ्याच्या कारची काच फोडून तब्बल ४ लाख ९० हजार रुपयांची रोकड लंपास केल्याची घटना १३ मार्च रोजी दुपारच्या सुमारास घडली.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिलीप कैलासराव सातळकर ( व्यवसाय – आडत व्यापारी, रा. जिरी, ता. वैजापूर) यांनी शुक्रवारी दुपारी शिऊर (बं.) येथील बँक ऑफ इंडिया शाखेतील बँक खात्यातून चार लाख ९० हजार रुपये काढले. ही रक्कम त्यांनी  त्यांच्या कार (क्र.एम.एच.२० सीएस २९२९) मध्ये ठेवली. त्यानंतर ते ज्यूस पिण्यासाठी  गाडीपासून थोड्या अंतरावर गेले. याच संधीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या कारची काच फोडून चार लाख ९० हजारांची रोकड चोरून नेली.  या प्रकरणी शिऊर पोलिस ठाण्यात  चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोउपनि ओगले करीत आहेत. दरम्यान या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी वाहनात रोकड ठेवताना खबरदारी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.