वैजापूर तालुक्यात ७१ टक्के मतदान : प्रमुख उमेदवारांकडून 'व्हिटॅमिन एमचा' जोरदार मारा !!


वैजापूर
तालुक्यातील ८ जिल्हा परिषद आणि १६ पंचायत समितीच्या जागांसाठी शनिवारी (ता.०७) रोजी २८१ मतदान केंद्रावर अपवाद वगळता मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. सकाळच्या सत्रात संथगतीने सूरू असलेल्या मतदानाची दुपारनंतर गती वाढून संपूर्ण मतदान प्रक्रिया पूर्ण पडल्यानंतर ७१.८० टक्के इतक्या मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला.
या निवडणुकीत प्रतिष्ठेची लढाई मानल्या जाणाऱ्या तालुक्यातील वांजरगांव गटात सर्वाधिक ७८.६३ टक्के तर सर्वात कमी शिऊर गटात ६७.२४ टक्के इतके मतदान झाले. दरम्यान तालुक्यातील बोरसर, संवंदगाव घायगांव, वाकला या गटातील लढती देखील लक्षवेधी ठरल्या आहेत.  पंचायत समितीच्या १६ जागांसाठी ६४ उमेदवार निवडणूक रिंगणात असून बहुतेक पंचायत समिती गणांमध्येही अत्यंत चुरशीच्या लढती पार पडल्या. वैजापूर पंचायत समितीत कोणत्या पक्षाची सत्ता येणार याचे चित्र सोमवारी निकालानंतर स्पष्ट होणार आहे. 


उमेदवारांच्या विजयासाठी नेतेमंडळींचा जोर....

शिवसेनेचे आमदार रमेश बोरनारे, माजी आमदार भाऊसाहेब चिकटगांवकर, माजी नगराध्यक्ष साबेर खान यांनी तर भाजप-राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या उमेदवारांच्या विजयासाठी नगराध्यक्ष डॉ. दिनेश परदेशी, जेष्ठ नेते भाऊसाहेब ठोंबरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अकील शेख यांनी पूर्ण ताकद पणाला लावल्याचे चित्र होते. असे जरी असले तरी निवडणुकीत कोणत्या पक्षातील उमेदवार कोणापेक्षा सरस ठरला हे निवडणूक निकालानंतरच स्पष्ट होणार आहे. सध्या या निवडणुकीत कोणत्या पक्षाचे उमेदवार अधिक निवडून येतात याबाबत नागरिकांत उत्सुकता शिगेला पोहचली असून खलबत सुरू आहे.


उमेदवारांकडून मतदासंघात 'व्हिटॅमिन एम' चा डोस !!

या निवडणुकीत देखील जवळपास सर्वच गटाच्या प्रमुख उमेदवारांनी मतदानाची टक्केवारी वाढवून मतदान आपल्या पारड्यात पाडून घेण्यासाठी अपवाद वगळता आप-आपल्या मतदारसंघात 'व्हिटॅमिन एम' डोसचा मारा केला. यामुळे मतदानाच्या टक्केवारीत चांगल्या पैकी भर पडल्याचे बोलले जात आहे. असे जरी असले तरी 'घेणार सगळ्यांकडून, देणार मात्र एकलाच' असे काहीसे चित्र शनिवारी बघावयास मिळाले.

वैजापूर तालुक्यात गटनिहाय झालेले मतदान
पुढीलप्रमाणे...

वाकला ७६.६७ टक्के

बोरसर - ७०.२६ टक्के

शिऊर ६७.२४ टक्के

सवंदगांव - ७३.९९ टक्के

लासूरगांव - ७३.३१ टक्के

घायगांव - ७६.२७ टक्के

वांजरगांव - ७८.६३ टक्के

महालगांव - ६८.६९ टक्के