वैजापूरात कायदा-सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी भविष्यातही पोलिसांची कठोर पावले !!
वैजापूर
शहरात दहशत माजवणाऱ्या गुन्हेगारी टोळीविरोधात वैजापूर पोलिसांनी कडक पावले उचलत टोळी प्रमुखासह सदस्यांवर हद्दपारीची कारवाई केली आहे. टोळीच्या गुन्हेगारी कृत्यांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते.
वैजापूर शहरात वास्तव्यास असलेले रोहित अनिल पठारे (२३), तुषार अनिल पठारे (२०) आणि सूरज बाबासाहेब भगत (२६) हे तिघे टोळी करून गंभीर स्वरूपाचे गुन्हे करत असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले. या आरोपींविरोधात पोलिस ठाणे वैजापूर येथे शारीरिक दुखापतीचे एकूण चार गंभीर गुन्हे दाखल दाखल असून, त्यांच्या कृत्यांमुळे सार्वजनिक शांतता भंग होत होती. या पार्श्वभूमीवर पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र पोलिस ह अधिनियम १९५१ मधील कलम ५५ अन्वये कारवाईचा प्रस्ताव सादर करण्यात आला. हा प्रस्ताव मान्य करत उपविभागीय पोलिस अधिकारी व पोलिस अधीक्षक, छत्रपती संभाजीनगर (ग्रामीण) यांनी टोळी प्रमुखासह सदस्यांवर हद्दपारीचा आदेश पारित केला. आदेशानुसार टोळी प्रमुख व दोन सदस्यांना छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातून तीन महिन्यांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. त्यानुसार वैजापूर पोलिसांनी ५ फेब्रुवारी २०२६ रोजी ही हद्दपारीची कारवाई प्रत्यक्षात अंमलात आणली. सदर कारवाईमुळे वैजापूर शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्यास मदत होणार आहे.
दरम्यान भविष्यातही अशा अपप्रवृत्तीना आळा टाकण्यासाठी कठोर पावले उचलण्यात येणार असल्याचा इशारा पोलिस निरीक्षक सत्यजित ताईतवाले यांनी या कारवाई नंतर दिला.




Social Plugin