वैजापूर
भरधाव वाहनाने दुचाकींना दिलेल्या धडकेत दोन ठार तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना तालुक्यातील जरूळ फाटालगत २८ फेब्रुवारी रोजी दुपारच्या सुमारास घडली.
अयान रमजान शहा(१९), अरमान शरीफ शेख (१९,दोघेही रा. खंडाळा) अशी घटनेतील मृतांची नावे आहेत. दरम्यान फैसल लाला खान (२०,रा. खंडाळा) हा घटनेत गंभीर झाला आहे. घटनेबाबत अधिक माहिती अशी की, ईद सणाच्या पार्श्वभूमीवर कपडे खरेदी करण्यासाठी अयान,अरमान,फैसल हे तिघेजण दोन दुचाकीने वैजापूरच्या दिशेने येत होते. दरम्यान जरूळ फाटालगत अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकींना जोराची धडक दिली. या जोरदार धडकेत दुचाकींचा अगदी चुराडा झाला. घटना घडताच जखमींना तातडीने शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी अयान याला मृत घोषित केले. फैसल व अरमान यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. मात्र जखमी अरमान याची प्रकृती गंभीर असल्याने अधिक उपचारासाठी छत्रपती संभाजीनगर येथे पाठविण्यात आले. परंतु रुग्णालयात पोहचण्या आधीच त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.

Social Plugin