प्रवासी महिलेची ५२ हजारांची रोकड लंपास...


वैजापूर
प्रवासी महिलेच्या पर्समधून ५२ हजारांची रोकड चोरी गेल्याची घटना शहरातील बस स्थानकात घडली. याप्रकरणी शुक्रवारी वैजापूर पोलिस ठाण्यात  चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, समिना शेख समीर या शहरातील जुना स्टेट बँक रोड परिसरात रहिवसास आहेत. दरम्यान मे महिन्यात त्यांच्या मुलीचे लग्न असल्याने त्या, त्यांची मुलगी, दीर व जाऊ हे चौघे छत्रपती संभाजीनगर येथे जाण्यासाठी ६ फेब्रुवारी रोजी वैजापूर बसस्थानकात आले. यावेळी जागा पकडण्यासाठी समिना यांनी  बसमध्ये प्रवेश केला. मात्र काही क्षणातच त्यांना त्यांच्या पर्सची चैन खुली दिसली व त्यातील ५२ हजारांची रोकड मिळून आली नाही. ही बाब लक्षात येताच त्यांनी आरडाओरड करण्यास सुरुवात केली. मात्र तोपर्यंत गर्दीचा फायदा घेत चोरट्याने घटनास्थळाहुन धूम ठोकली. समिना शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिस ठाण्यात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.