वैजापूर
शहरातील म्हसोबा चौकात एका मद्याधुंद ट्रक चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने झालेल्या अपघातात तीन जण गंभीर जखमी झाल्याची घटना १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळच्या सुमारास घडली. जखमींमध्ये एका भाजीपाला विक्रेत्याचा देखील समावेश आहे. दरम्यान घटनेतील जखमींची नावे मात्र समजू शकली नाहीत.
या घटनेबाबत अधिक माहिती अशी की, शहरातील म्हसोबा चौक परिसरात मंगळवारी सायंकाळी सव्वा पाच वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकच्या (क्रमांक एमएच २० डीई ७८९८) चालकाचा वाहनावरील ताबा सुटला. यावेळी ट्रकने रस्त्याने जाणाऱ्या एका लोडिंग रिक्षाला जोराची धडक दिली. या जोरदार धडकेत रिक्षा चालकासह थेट रस्त्याच्या मधोमध असलेल्या दुभाजकावर जाऊन पोहचली. यानंतर भरधाव ट्रकने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या एका हायवाला जोराची धडक देत एका मोटारसायकलीचा देखील चुराडा केला. याशिवाय एका भाजीपाला विक्रेत्याला देखील जोराची धडक दिल्याने तो देखील गंभीर जखमी झाला. या घटनेदरम्यान रस्त्याच्या कडेला बसणारा फळविक्रेता मात्र बालंबाल बचावला. घटना घडताच ट्रक चालक, लोडिंग रिक्षा चालक व एक भाजीविक्रेत्याला गंभीर जखमी अवस्थेत उपचारासाठी रुग्णालयांत दाखल करण्यात आले. प्रत्यक्षदर्शीनी दिलेल्या प्राथमिक माहितीनुसार ट्रक चालक हा मद्याधुंद अवस्थेत असल्याने त्याचा वाहनावरील ताबा सुटून सदरील घटना घडली. घटनेची माहिती मिळताच सहायक पोलिस निरीक्षक विजय देशमुख, पवन सुंदर्डे व इतर कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. यावेळी परिसरात काही काळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती. मात्र पोलिसांनी नागरिकांच्या मदतीने वाहतूक पूर्वपदावर आणली. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे.




Social Plugin