वैजापूर
पतसंस्थेकडून घेतलेल्या कर्जाच्या परतफेडीसाठी दिलेला धनादेश न वटता अनादरीत झाल्या प्रकरणी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. के. खान (मॅडम) यांनी एकास ६ महिने कारावास व पतसंस्थेस ४० हजार रुपये नुकसान भरपाई देण्याची शिक्षा २३ फेब्रुवारी रोजी सुनावली. प्रकाश मुक्ताबा बत्तीसे (रा.महालगाव, ता.वैजापूर) असे शिक्षा ठोठाविण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रकाश बत्तीसे हा तालुक्यातील महालगाव येथील रहिवासी आहे. त्याने सन-२०१४ मध्ये येथील रेणुकामाता महिला नागरी सहकारी पतसंस्थेकडून १५ हजार रुपये कर्ज घेतले होते. दरम्यान कर्ज घेतलेल्या रकमेसाठी संबंधित पतसंस्थेने बत्तीसे याच्याकडे तगादा लावला.
यामुळे सन-२०१६ मध्ये त्याने २१ हजार ५२५ रुपयांचा धनादेश पतसंस्थेस दिला. मात्र पुरेशी रकमेअभावी धनादेश न वटता अनादरित होऊन परत आला. ॲड. एस. एस. ठोळे यांचेमार्फत आरोपीस नोटीस पाठवून अनादरीत झालेल्या धनादेशाची रक्कम पतसंस्थेत जमा करण्यास सांगितले. मात्र प्रकाश बत्तीसे याने रक्कम न भरल्याने पतसंस्थेने वैजापूर येथील न्यायालयात ॲड. एस. एस. ठोळे यांचेमार्फत चलनक्षम दस्तऐवज कायद्याचे कलम १३८ नुसार फिर्याद दाखल केली. न्यायालयाने उपरोक्त प्रकरणातील फिर्याद, सबळ साक्षीपुरावा व युक्तिवाद लक्षात घेता प्रकाश बत्तीसे यास ६ महिने कारावास, पतसंस्थेस ४० हजार रुपये नुकसान भरपाई व भरपाई न दिल्यास तीन महिने कारावासाची शिक्षा सुनावली. प्रकरणात पतसंस्थेच्यावतीने ॲड. एस. एस. ठोळे व ॲड. आकाश ठोळे यांनी कामकाज पाहिले.



Social Plugin