करंजगाव शिवारात अफूची शेती : २७ लाखांचा स्टॉक जप्त...


वैजापूर

अफुची शेती करणाऱ्या एकाविरुद्ध स्थानिक गुन्हे शाखा व वैजापूर पोलिसांच्या पथकाने संयुक्त कारवाई करत २७ लाख रुपये किंमतीचा स्टॉक (अफूची झाडे) जप्त केला. तालुक्यातील करंजगाव येथे २१ फेब्रुवारी रोजी पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी कचरु बाबुराव धुरट (६५,रा.करंजगाव) याच्याविरुद्ध वैजापूर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वैजापूर तालुक्यातील करंजगाव शिवारातील शेत गट क्रमांक १३२ मधील शेतात एकाने अफुची झाडे लावली असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. शनिवारी  पथकाने त्या ठिकाणी जाऊन छापा टाकला असता शेतात अफूची २७ लाख ९ हजार रुपये किंमतीची १८० किलो वजनाची अफुची झाडे मिळून आली. यावेळी पोलिसांनी अधिक चौकशी केली असता कचरु धुरट याने या अफूच्या झाडांचे संगोपन केल्याचे पथकाच्या निदर्शनास आले. याप्रकरणी सायंकाळी उशिरा पोलिसांत एनडीपीएस कायद्यान्वये कचरु धुरट याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.