सोन्या चांदीच्या दरात होणार घसरण !!!!!



वॉशिंग्टन

आंतरराष्ट्रीय बाजारात डॉलर सशक्त करून येणाऱ्या काळात डॉलर आणखीन 'वजनदार' करण्यासाठी अमेरिकेकडून सर्वतोपरी  प्रयत्न केले जात आहेत. यापार्श्वभूमीवर आता अमेरिका रशियासोबत एक मोठा करार करण्याच्या तयारीत आहे. दोन्ही देशात हा करार झाल्यास  सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण होऊ शकते.गुरुवारी ब्ल्यूमबर्गनं प्रकाशित केलेल्या एका वृत्तानुसार रशियाचे अध्यक्ष ब्लादीमार पुतीन हे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या सोबत संभाव्य आर्थिक भागिदारीच्या अंतर्गत 'अमेरिकन डॉलर सेटलमेंट सिस्टिम' पुन्हा सक्रिय करण्याच्या विचारात आहेत. याचा अर्थ अतिशय स्पष्ट आहे. दोन्ही देशांमधील सगळे व्यवहार डॉलरमध्ये होतील. अमेरिका व रशिया एक गुप्त करार करण्याच्या तयारीत असून त्यासाठी उच्चस्तरावर हालचाली सुरु आहेत. या कराराचे थेट परिणाम सोन्या-चांदीच्या दरांवर होण्याची दाट शक्यता आहे. अमेरिका-रशिया महत्त्वाचा करार करण्याच्या तयारीत असल्याची बातमी समोर येताच सोन्या-चांदीच्या दरांमध्ये मोठी पडझड पाहायला मिळाली. गुरुवारी रात्री आंतरराष्ट्रीय बाजारात सोन्याचे दर ४ टक्क्यांनी व चांदीचे दर ८ टक्क्यांपेक्षा अधिकने घरसले. एमसीएक्सवरही मोठी पडझड बघायला मिळाली. चांदीच्या बाबतीत परिस्थिती अधिक गंभीर होती. दोनदा लोअर सर्किट लागल्यानं गुंतवणूकदार धास्तावले. दिवसाअखेरीस चांदीचे दर २६ हजारांची तर सोन्याच्या दरात ६ हजारांची घसरण नोंदवली गेली.अमेरिका आणि रशिया यांच्यामध्ये जीवाश्म इंधन, नैसर्गिक वायू, तेल आणि महत्त्वाच्या कच्च्या मालावर आर्थिक करार होण्याची शक्यता आहे. सात महत्त्वाच्या क्षेत्रांसाठी दोन्ही देश करार करतील. २०२२ मध्ये स्विफ्ट आर्थिक पद्धत हटवण्यात आली. त्यामुळे या दोन्ही देशात डॉलर आधारित व्यापार कमी झाला. आता तो पुन्हा एकदा पूर्वपदावर आणण्याचे प्रयत्न सुरु आहेत. याआधी रशियानं स्थानिक चलनात व्यापार केला आहे. रशियानं चीन आणि भारतासोबतचा जवळपास ९० टक्के व्यापार राष्ट्रीय चलनात केला आहे. ब्रिक्स देशांचा स्थानिक चलनांमधील व्यापार ६० ते ७० टक्क्यांवर पोहोचला आहे. अमेरिका आणि इराण यांच्यात सध्या उच्चस्तरीय चर्चा सुरु आहे. जीवाश्म इंधनाला प्राधान्य देण्याची रुपरेखा आखली गेली आहे. हा प्रस्ताव मंजूर झाल्यास जगातील दोन सर्वात मोठ्या ऊर्जा शक्ती प्रतिस्पर्धी न राहता भागीदार होतील. रशिया आणि अमेरिकेतील करार मूर्त स्वरुपात आल्यास सोन्या-चांदीसारख्या सुरक्षित गुंतवणुकीत मोठे बदल दिसतील. डॉलर मजबूत झाल्यास शेअर बाजारातील स्थिती सुधारेल. गुंतवणूकदारांचा सोनं-चांदी सोडून शेअर बाजारात गुंतवणुकीसाठी कल वाढेल मग  अशा स्थितीत सोनं, चांदीच्या दरांमध्ये मोठी पडझड पाहायला मिळू शकते.