वैजापूर कृ.उ.बा. समितीच्या सभापती पदावरून रामहरी जाधवांची उचलबांगडी....

 

वैजापूर 
वैजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत  वाढत असलेला असंतोष व अंतर्गत राजकीय हालचालींच्या पार्श्वभूमीवर सभापती रामहरी कारभारी जाधव यांच्याविरोधात दाखल करण्यात आलेला अविश्वास ठराव बुधवारी झालेल्या विशेष सभेत बहुमताने मंजूर करण्यात आला. १८ संचालक असलेल्या समितीतील १३ संचालकांनी ठरावाच्या समर्थनार्थ हात उंचावून मतदान केल्याने रामहरी जाधव यांची सभापती पदावरून उचलबांगडी करण्यात संचालकांना यश आले आहे.
महाराष्ट्र कृषी उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम १९६३ च्या कलम २३ अंतर्गत ही कारवाई करण्यात आली. सन २०२३ ते २०२८ या कालावधीसाठी गठीत संचालक मंडळात २२ मे २०२३ रोजी रामहरी जाधव यांची सभापती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. मात्र संस्थेच्या उद्दिष्टांनुसार व नियमांनुसार कामकाज न करता, संचालकांना विश्वासात न घेता निर्णय घेतल्याचा आरोप १३ संचालकांनी केला होता.विशेष पत्रिकेत समाविष्ट विषयांवर पुरेशी चर्चा होत नसल्याने तसेच मासिक सभांमध्ये समर्थन वा विरोध विधिवत नोंदवला जात नसल्याने समितीच्या कामकाजात पारदर्शकतेचा अभाव दिसून येत असल्याचा आरोप करण्यात आला. यासोबतच शेतकऱ्यांच्या हितासाठी तसेच बाजारातील मूलभूत सुविधांसाठी अपेक्षित प्रयत्न न झाल्याचेही नमूद करण्यात आले. या कारणांमुळे २ फेब्रुवारी २०२६ रोजी जिल्हाधिकाऱ्यांकडे अविश्वास ठरावाची मागणी करणारा अर्ज सादर करण्यात आला होता.जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रक्रियेसाठी उपविभागीय अधिकारी डॉ. अरुण जऱ्हाड यांची प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली. ५ फेब्रुवारी २०२६ रोजी सर्व संचालकांना नोटीस बजावून ११ फेब्रुवारी २०२६ रोजी विशेष सभा घेण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली होती. बुधवारी झालेल्या सभेत १३ संचालकांनी अविश्वास ठरावाच्या समर्थनार्थ मतदान केले. उपस्थित संचालकांच्या स्वाक्षऱ्याही नोंदविण्यात आल्या. यावेळी प्रशासनातर्फे सहायक निबंधक तथा पदसिद्ध अधिकारी किरण चौधरी, बाजार समिती सचिव प्रल्हाद मोटे व सहायक सचिव सुनील निकम उपस्थित होते.
अविश्वास ठरावास समर्थन देणाऱ्यांमध्ये शिवकन्या पवार,  काकासाहेब पाटील, अविनाश गलांडे, कल्याण दांगोडे, ज्ञानेश्वर जगताप, अनिता वाणी, प्रशांत सदाफळ, नजन रजनीकांत, गणेश इंगळे, प्रशांत त्रिभुवन, विजय ठोंबरे, शेख रियाज व बाबासाहेब गायकवाड यांचा समावेश होता. तर सभापती रामहरी जाधव, संजय निकम, प्रविण पवार, कल्याण जगताप व गोरख आहेर हे सभेला अनुपस्थित राहिले.
पूर्वी समितीत शिवसेना (शिंदे गट)चे रामहरी जाधव व भाजपाच्या उपसभापती शिवकन्या पवार यांच्या नेतृत्वाखाली सत्तासमीकरण होते. मात्र नगर पालिका, जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांनंतर तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठी उलथापालथ झाली. काही संचालक भाजपाच्या बाजूने आले तसेच राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)च्या समर्थनामुळे एकूण १३ संचालक एकत्र आले. या १३ संचालकांनीच अविश्वास ठराव सादर करून तो बहुमताने मंजूर करून घेतला.