वैजापूरात विजेच्या धक्क्याने कंत्राटी कामगाराचा मृत्यू....



वैजापूर 

शहरातील भूमी अभिलेख कार्यालय परिसरात विद्युत रोहित्राशी संबंधित दुरुस्तीचे काम करताना एका कंत्राटी कामगाराचा विजेच्या धक्क्याने मृत्यु झाल्याची घटना ता. १६ जानेवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली. सोमनाथ आसाराम पानडघळे (२९, रा. आघुर ता. वैजापूर) असे घटनेतील मृतकाचे नाव आहे. दरम्यान या घटनेनंतर मृत सोमनाथ यांच्या संतप्त नातलगांसह गावकऱ्यांनी शहरातील महावितरण कार्यालय गाठले. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत संबंधितांवर कायदेशीर कारवाई करू असे आश्वासन देत जमावाला शांत केले.


याबाबत प्राप्त माहितीनुसार, सोमनाथ पानडघळे हा तालुक्यातील आघुर येथील रहिवासी होता. तो महावितरणाच्या ठेकेदाराकडे कंत्राटी कामगार म्हणून कामाला होता. शुक्रवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास भूमिअभिलेख कार्यालय परिसरात विद्युत रोहित्राशी संबंधित काम सुरू असल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. यावेळी सोमनाथ हा तेथील विद्युत खांबावर चढला. मात्र काही समजण्याच्या आत विद्युत वाहिनीत (तार) अचानक प्रवाह सुरू झाला. काही समजण्याच्या आत विजेच्या धक्क्याने सोमनाथ हा विद्युत खांबावरच गतप्राण झाला. घटनेची माहिती मिळताच  पोलिस प्रशासनासह नगर परिषद व महावितरणाच्या कर्मचाऱ्यांनी  घटनास्थळी धाव घेतली. यावेळी अनिल राऊत, मोहन तुपे व रुग्णवाहिका चालक वाहेद पठाण यांनी सोमनाथला विद्युत खांबावरून खाली आणले. त्याला शहरातील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासून त्यास मृत घोषित केले. घटना घडताच संतप्त नातलगांसह आघुर येथील ग्रामस्थांनी महावितरण कार्यालय गाठले.  घटना घडली तेंव्हा विद्युत खंडन परवाना (परमिट) घेतले होते. तरी देखील विद्युत वाहिनीत अचानक प्रवाह सुरू झालाच कसा ? असा सवाल नातलगांनी उपस्थित करत महावितरण कार्यालय गाठले. यावेळी परिसरात बराच वेळ तणावाचे वातावरण होते. मात्र पोलिस प्रशासनाने जमावाची समजूत काढत संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याचे आश्वासन दिले. या नंतर जमाव शांत झाला. याबाबत महावितरणाच्या संबंधितांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला मात्र त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.