असा असू शकतो जिल्हा परिषद निवडणुकीचा कार्यक्रम.....


वैजापूर

राज्यातील ग्रामीण भागात बहुप्रतिक्षीत असणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका जानेवारीच्या (२०२६) अंतिम आठवड्यात पार पडण्याची शक्यता सूत्रांनी व्यक्त केली आहे.  या निवडणुका दोन टप्प्यात पार पडणार असून पहिल्या टप्प्यात १२ जिल्हा परिषदा १२५ पंचायत समितींच्या निवडणूका पार पडू शकतात अशी देखील माहिती समोर येत आहे.
जिल्हा परिषद निवडणुकीचा रणसंग्राम नव्या वर्षात पार पडणार असून राज्यातील प्रलंबित ३२ जिल्हा परिषदा निवडणुका जाहीर होणार आहे. आरक्षणाच्या तिढ्यामुळे जिल्हा परिषदेच्या निवडणुका दोन टप्प्यात होण्याची शक्यता असून १२ जिल्हा परिषदा व ३३६ पैकी १२५ पंचायत समितींच्या निवडणुका २१ दिवसांत होणार आहेत. त्याबाबतची आयोगाची तयारी पूर्ण झाली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, जानेवारीत १२ जिल्हा परिषदा आणि १२५ पंचायत समित्यांचं बिगुल वाजणार आहे. ८ जानेवारीच्या आधी जिल्हा परिषदेसाठी आचारसंहिता लागू शकते. सर्वोच्च न्यायालयाने राज्यातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ३१ जानेवारी २०२६ पर्यंतची मुदत दिलेली आहे. पण या कालावधीत जिल्हा परिषदेच्या निवडणुका होण्याची शक्यता कमीच दिसतेय. २० जिल्हा परिषदेत व  २११ पंचायत समित्यांमध्ये आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे या ठिकाणाच्या निवडणुकांना आयोगाकडून स्थगिती देण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर उर्वरित १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समित्यांची निवडणूक जानेवारीत होऊ शकते. त्याबाबतची आयोगाची तयारी पूर्ण झाल्याची माहिती आहे.

पहिल्या टप्प्यात पार पडू शकतात या निवडणुका !


३२ पैकी १२ जिल्हा परिषदेत ५० टक्क्यांची आरक्षण मर्यादेचे पालन करण्यात आलेय. त्याठिकाणी निवडणूक जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यात पार पडण्याची शक्यता आहे. २१ दिवसांत निवडणूक कार्यक्रम पूर्ण करण्याचा आयोगाचा प्रयत्न आहे. सोलापूर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर, छत्रपती संभाजीनगर, परभणी, धाराशिव, लातूर या जिल्हा परिषदेच्या निवडणुका पहिल्या टप्प्यात होण्याची शक्यता असून ६ ते ८ जानेवारीच्या दरम्यान आयोगाकडून निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात येऊ शकतो. उर्वरित जिल्हा परिषदा व पंचायत समित्यांच्या निवडणुका ३१ जानेवारीनंतरच होणार आहे.

असा असू शकतो १२ जिल्हा परिषदांचा संभाव्य कार्यक्रम....

निवडणुकीची घोषणा - ६ ते ८ जानेवारी

उमेदवारी अर्ज भरणे १० ते १७ जानेवारी

अर्जाची छाननी अन् माघार - १८ ते २० जानेवारी

चिन्ह वाटप - २१ जानेवारी

मतदान - ३० जानेवारी

मतमोजणी - ३१ जानेवारी