वैजापूर
नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला शहरातील दुय्यम निबंधक कार्यालयात खरेदी-विक्रीच्या एका व्यवहाराने अचानक वादाचे गंभीर स्वरूप धारण केल्याची धक्कादायक घटना घडली. एका गाळ्याच्या नोंदणीवरून झालेल्या या वादामुळे कार्यालयातील अंतर्गत कारभार, अधिकाऱ्यांची भूमिका, दस्तलेखकांची मनमानी आणि कथित आर्थिक देवाणघेवाण यावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हा वाद इतका विकोपाला गेला की, थेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची धमकी महिला अधिकाऱ्याने दिल्याने कार्यालयात काही काळ तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते. या घटनेच्या पार्श्वभूमीवर भ्रष्टाचाराची वाळवी लागलेल्या या कार्यालयात नागरिकांची अवस्था 'मुक्याला टोला, हाक न बोंब' अशी काहीशी झाली आहे.
शहरानजीक असलेल्या रोटेगाव परिसरातील एका व्यावसायिकाचा गाळा विक्रीस काढण्यात आला होता. या व्यवहारासाठी संबंधित व्यावसायिक आपल्या वकिलासह वैजापूर येथील दुय्यम निबंधक कार्यालयात दाखल झाले. गाळ्याची नोंदणी करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करण्यात आली असली तरी, त्यामध्ये काही त्रुटी असल्याचे कारण पुढे करत दुय्यम निबंधकांनी हा व्यवहार करण्यास स्पष्ट नकार दिला. या नकारामुळे व्यावसायिक, त्यांचा वकील आणि दुय्यम निबंधक यांच्यात प्रथम शाब्दिक चर्चा आणि नंतर जोरदार वादाला सुरुवात झाली. व्यावसायिक आणि वकिलाने आवश्यक कागदपत्रे उपलब्ध असल्याचा दावा करत नोंदणी करण्याचा आग्रह धरला, तर दुसरीकडे अधिकाऱ्यांनी नियमांचे कारण देत आपली भूमिका ठाम ठेवली. वाद वाढत असतानाच संबंधित महिला दुय्यम निबंधकांनी, “एका महिला अधिकाऱ्यावर दबाव टाकला जात आहे. याबाबत मी तुमच्यावर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करू शकते,” अशी थेट धमकी दिली. या विधानामुळे वातावरण अधिकच चिघळले. यावर वकील व व्यावसायिकांनीही आक्रमक प्रतिक्रिया देत, “आम्ही कोणत्याही प्रकारचा दबाव किंवा अपमानास्पद भाषा वापरलेली नाही. आम्ही आमच्या मालमत्तेच्या खरेदी-विक्रीबाबतच चर्चा करत असताना महिला–पुरुष भेदभाव पुढे करून विषयाला वेगळे वळण दिले जात आहे,” असे स्पष्टपणे सांगितले. वाद अधिक चिघळू नये म्हणून कार्यालयातील अन्य कर्मचारी आणि काही दस्तलेखकांनी मध्यस्थी करत दोन्ही बाजूंना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ चाललेल्या चर्चेनंतर अखेर तात्पुरता तोडगा निघाला आणि प्रकरण शांत करण्यात आले. या संपूर्ण व्यवहारानंतर कार्यालयात व शहरात एकच चर्चा रंगू लागली, ती म्हणजे या व्यवहारासाठी कथितपणे ‘एम व्हिटॅमिन’ मागितल्याची. असे जरी असले तरी या चर्चेत कितपत तथ्य आहे, याबाबत अधिकृतरीत्या काहीही समोर आले नसले तरी, दुय्यम निबंधक कार्यालयातील पूर्वीच्या अनुभवांमुळे नागरिकांचा संशय अधिकच बळावला आहे. हा वाद जरी त्या क्षणी मिटला असला तरी त्याचे पडसाद शहरभर उमटू लागले. दरम्यान याबाबत संबंधित महिला अधिकाऱ्याशी संपर्क साधून कानोसा घेण्याचा प्रयत्न केला. परंतु त्यांनी काॅल रिसिव्ह केला नाही.
अनेकांनी नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, दस्तनोंदणीच्या बहुतांश व्यवहारांत ‘विटॅमिन एम’ शिवाय काम होत नाही, अशीच परिस्थिती वर्षानुवर्षे सुरू आहे.
मुक्याला टोला हाक न बोंब....
या कार्यालयात कुठल्याही कामासाठी येणाऱ्या नागरिकांना काही न काही 'मोजल्याशिवाय' काम होत नाही. अशी परिस्थिती जरी असली तरी आपली काम होणे हे नागरिकांना प्राधान्याचे असते यामुळे अधिकाऱ्यांसह सर्वांचेच भागते. या पार्श्वभूमीवर कार्यालयात काम घेऊन येणाऱ्याची परिस्थिती ही 'मुक्याला टोला हाक न बोंब' अशी होऊन जाते.
वैजापूरचे छत्रपती संभाजीनगर कनेक्शन !
विशेष म्हणजे छत्रपती संभाजीनगर येथून वैजापूरचे व्यवहार सांभाळणाऱ्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याच्या तालावर येथील कार्यालय चालते, अशीही चर्चा आहे. त्यामुळे नियम, कायदे आणि नागरिकांच्या अडचणी बाजूला पडून जिसकी 'लाठी' उसकी भैंस’ असा कारभार सुरू असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.
तडकाफडकी पदत्याग, नवा अधिकारी कार्यरत..
या घटनेच्या पार्श्वभूमीवर 'त्या' महिला अधिकाऱ्यांनी तडकाफडकी आपला पदभार सोडल्याची माहिती समोर आली. विशेष म्हणजे नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्या जागी अंबिलढगे यांनी दुय्यम निबंधक म्हणून पदभार स्वीकारला. मात्र, केवळ अधिकारी बदलल्याने परिस्थिती बदलेल का? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
सामान्य नागरिकांची तुफान लूट..
दस्तनोंदणीचे अवाच्या सव्वा दर ठरवून दस्तलेखकांकडून खुलेआम मनमानी केली जात आहे. अधिकाऱ्यांचेही यातून फावत असल्यामुळे ते या लुटीकडे डोळेझाक करत असल्याचा आरोप आहे. परिणामी, सामान्य मालमत्ता खरेदीदार व विक्रेते नाहक आर्थिक, मानसिक आणि वेळेच्या त्रासाला सामोरे जात आहेत.


.jpg)
Social Plugin