वैजापूर
तालुक्यातील हडसपिंपळगाव येथे घरफोडी करणाऱ्यास छञपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या (ग्रा.) पोलिसांनी तीन लाख ५६ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतल्याची कारवाई २५ डिसेंबर रोजी केली. ही कारवाई भेंडाळा - गंगापूर रस्त्यावर पोलिसांनी केली. दऱ्या बरांड्या भोसले (रा.अंतापूर, ता.गंगापूर) असे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्याचे नाव आहे.याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, भागीनाथ तुळशीराम निघोटे हे तालुक्यातील हडसपिंपळगाव येथील रहिवासी आहेत. दरम्यान ११ डिसेंबर रोजी सकाळी ते पत्नीसह घराला कुलूप लावून शेतामध्ये कापूस वेचण्यासाठी गेले होते. सायंकाळी ते घरी परतले तेंव्हा त्यांना घरातील बेडरुममधील कपाटाचे लॉक तोडून त्यातील ३५ हजारांची रोकड व दीड तोळे सोन्याचे दागिने असा एकूण ६७ हजार रुपये किंमतीचा ऐवज चोरी गेल्याचे लक्षात आले. याप्रकरणी वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सदर गुन्हयाचा तपास छञपती संभाजीनगर येथील स्थानिक गुन्हे शाखेकडे (ग्रा.) वर्ग करण्यात आला. गुन्हयाच्या तपासा दरम्यान सदर गुन्हा हा दऱ्या बरांड्या भोसले व गुंठ्या उर्फ स्वरुप डिस्चार्ज (दोघे रा.अंतापूर, ता.गंगापूर) या दोघांनी केल्याची माहिती स्थागुशाच्या पथकाला मिळाली. या आधारे पथकाने महितीतील दऱ्या भोसले याला मोटारसायकलने भेंडाळाकडून - गंगापूरकडे जाणाऱ्या रस्त्यावर सापळा रचून गुरुवारी ताब्यात घेतले. पथकाने पोलिसी खाक्या दाखवताच त्याने सदर गुन्हा गावातीलच गुंठ्या उर्फ स्वरुप डिस्चार्ज काळे याच्या सोबतीने केल्याची कबुली दिली. याशिवाय गंगापूर पोलिस ठाणे हद्दीतील साजराबाद व संजरपूर येथील गुन्ह्यांची कबुली दिली. लगेचच पोलिसांनी त्याला चोरी केलेला ऐवज व मोटारसायकल असे एकूण तीन लाख ५६ हजार रुपयांच्या मुद्देमालासह ताब्यात घेतले. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक डॉ. विनयकुमार राठोड, अप्पर पोलिस अधीक्षक अन्नपुर्णासिंह यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपुत, पो. उपनि. महेश घुगे, हवालदार कासीम शेख, प्रमोद पाटील, सचिन राठोड, सुनिल गोरे, बलबिरसिंग बहुरे, शिवाजी मगर यांच्या पथकाने केली.
.jpg)

.jpg)
Social Plugin